शिवसेनेतील जवळच्या पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट

प्रमोद बोडके
रविवार, 26 ऑगस्ट 2018

एकीकडे जुन्या शिवसैनिकांना बाजूला करत असतानाच दुसरीकडे पदावर असलेल्या शिवसैनिकांना पदोन्नती देण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांच्यावर लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्याकडे असलेली सोलापूर विभागाच्या जिल्हा प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेनेत खळबळ उडवून देणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी मातोश्रीवरून घडल्या आहेत. अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत नाळ असलेले पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे व गेल्या काही वर्षात शिवसेनेशी घरोबा केलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील सेनेच्या पदांवरून आउट झाले आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सेनेत कमालीचे बदल झाले आहेत. जिल्ह्याच्या सेनेवर आता संपर्कप्रमुख डॉ. तानाजीराव सावंत यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. 

एकीकडे जुन्या शिवसैनिकांना बाजूला करत असतानाच दुसरीकडे पदावर असलेल्या शिवसैनिकांना पदोन्नती देण्यात आली आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांच्यावर लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्याकडे असलेली सोलापूर विभागाच्या जिल्हा प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठोंगे-पाटील यांच्या कार्यक्षेत्रात वाढ करून त्यांच्याकडे सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे असलेली समन्वयाची जबाबदारी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचे बंधू व सक्रिय राजकारणापासून दूर गेलेल्या शिवाजी सावंत यांच्यावर आली आहे. पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांची जबाबदारी संभाजी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

बरडे यांचा सर्वपक्षीयांशी असलेला दोस्तांना आणि सुशीलकुमार शिंदेची घेतलेली भेट भोवल्याचे मानले जात आहे. तशीच काहीशी स्थिती डिकोळे यांच्याबाबतीत झाली आहे. कधी निमगावच्या शिंदे बंधूंशी तर कधी अकलूजच्या मोहिते-पाटलांशी असलेला दोस्तांना, करमाळ्याचे एकमेव सेना आमदार नारायण पाटील यांनी पद्धतशीरपणे सेनेच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविला. शिवाय संपर्कप्रमुख डॉ. सावंत यांनीही डिकोळेंचा दोस्तांना पूर्वीच हेरल्याचे मानले जात आहे. 

डॉ. मोहिते-पाटलांचा अगोदरच राजीनामा -
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरच सहसंपर्कप्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी तत्कालीन संपर्कप्रमुख खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे राजीनामा दिल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिल्यानंतर माढ्यातील सेनेचे उमेदवार म्हणून डॉ. मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. निवडणुकीच्या तोंडावर पदावर मोहिते-पाटील आउट झाल्याने आगामी लोकसभा निवडणूक ते लढणार की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. 

आता लक्ष युवासेनेच्या नेतृत्वाकडे... -
गणेश वानकर यांना पदोन्नती मिळाल्याने रिक्त झालेल्या युवासेना जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत आतापासूनच चर्चेला उधाण आले आहे. या पदावर मोहोळ तालुक्‍यातील की करमाळा तालुक्‍यातील शिवसैनिकाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपर्कप्रमुख डॉ. तानाजीराव सावंत यांनी सोलापूरची शिवसेना आज गंगे सारखी स्वच्छ केली. ज्यांनी शिवसेनेचा वापर स्वार्थासाठी केला त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवू. निष्ठावंत व कट्टर सैनिकांना नेतृत्वाची संधी दिली. पुढील काळात याच तत्त्वाने निष्ठावंत शिवसैनिकांना संधी दिली जाईल. डॉ. सावंत यांनी दाखविलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवत जिल्ह्यात सेनेचा भगवा निश्‍चित फडकवू. पक्षाशी केली जाणारी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. 
- लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख, सोलापूर 
 

Web Title: There has been a change in the Shiv Sena party