#KolhapurFloods महापुरात किती लोक अडकले याचा अंदाज नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

या महापुरात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यामध्ये जीवित हानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे मात्र याबाबतची खात्री कोणी देत नाही.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात महापुराने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील 1030 गावांपैकी निम्म्या गावाना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महापुराचा फटका बसला आहे. हजारो गुरेढोरे सोडून देण्यात आले आहेत. मात्र संपर्क नसलेल्या गावात मदत यंत्रणा पोचली किंवा कसे याची कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही.

पुराच्या पाण्याने हाहाकार माजला आहे. गावच्या गाव महापुरात बुडाली आहेत . रस्ते पाण्याखाली गेल्याने दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. गावागावातून वीज गायब असल्याने संपर्काची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नेमक्या किती गावात पाणी घुसले आहे, किती लोकांचे स्थलांतर झाले आहे, गावात किती लोक अडकले आहेत, जनावरांची काय परिस्थिती आहे ,याची कोणतीही माहिती आज घडीला उपलब्ध असल्याचे दिसत नाही किंवा त्याबाबत प्रशासन काहीही भाष्य करताना दिसत नाही.

या महापुरात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यामध्ये जीवित हानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे मात्र याबाबतची खात्री कोणी देत नाही. ज्या ठिकाणी संपर्क होत आहे तिथलीच माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे . जिथे संपर्क होत नाही तिथली माहिती मात्र उपलब्ध होताना दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no estimate of how many people stuck in floods at kolhapur