तेथे झाला लाखाचा गोंधळ

संजय काटे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

सहकार खात्याचे अपर लेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी या प्रकरणी आज फिर्याद दिली. जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या आदेशानुसार लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे एक एप्रिल 2010 ते 31 मार्च 2018 या वर्षांतील चार मुद्द्यांवर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आले. यातील विमा रक्कम व वारसांना देण्यात येणारी रक्कम यातील अफरातफरीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते

श्रीगोंदे : सभासद अपघात विमा रकमेतील एक लाख रुपये मृत सभासदाच्या वारसांना न देता अफरातफर केल्याच्या आरोपावरून लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष लालासाहेब काकडे व सचिव बबन भागवत यांच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

सहकार खात्याचे अपर लेखापरीक्षक महेंद्र घोडके यांनी या प्रकरणी आज फिर्याद दिली. जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या आदेशानुसार लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे एक एप्रिल 2010 ते 31 मार्च 2018 या वर्षांतील चार मुद्द्यांवर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आले. यातील विमा रक्कम व वारसांना देण्यात येणारी रक्कम यातील अफरातफरीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. 

संस्थेचे सभासद गोरख काकडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये दोन टप्प्यांत विमा कंपनीने त्यांच्यासाठी दोन लाख 80 हजार रुपये सेवा संस्थेच्या खात्यात जमा केले होते. काकडे यांच्याकडील कर्ज वसूल करून उर्वरित सर्व रक्कम वारसदार मंदा काकडे यांना देणे बंधनकारक होते. मात्र, या रकमेत एक लाखाची तफावत आढळली. याबाबत श्रीमती काकडे यांनी सहकार खात्याकडे तक्रार अर्ज करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

या पाठपुराव्यामुळे या प्रकरणाची चौकशी सहकार खात्याकडून करण्यात आली. दरम्यान, ही चौकशी सुरू झाल्यानंतर संस्थेने मंदा काकडे यांच्या खात्यावर राहिलेली एक लाख रुपये रक्कम व व्याज 72 हजार 590 रुपये परस्पर जमा केले. त्यामुळे संस्थेने वेळेत विम्याची रक्कम दिली नाही, यावर एकाअर्थी शिक्कामोर्तबच झाले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्रीमती काकडे यांच्या पाठपुराव्याला त्यामुळे यश आलेले आहे.

जिल्ह्यात अशा बहुतांश ठिकाणी अशा घटना घडत असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सहकार खात्याने या घटनेवरून सगळ्याच सोसायट्यांमधून वाटप करण्यात आलेल्या विमा रकमेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

दोघांवर गुन्हा 
या अफरातफरीला संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष लालासाहेब काकडे व सचिव भागवत यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

थेट लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचना! 
मृत सभासदांचा मुलगा बजरंग काकडे लष्करात आहे. त्यांनी कुटुंबावर झालेला अन्याय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर थेट तेथून सहकार खात्याला पत्रव्यवहार करून दोषींवर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची लेखी सूचना आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was an uproar of millions