त्याने सव्वाकोटींचा कांदा खाल्ला, मित्रालाच लावले चंदन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

विकलेल्या कांदा, कोबी आदी मालाचे दोन-तीन दिवसात रोख पैसे अदा करुन त्याने विश्वास संपादन केला होता. तसेच तो सुकेवाडी येथे राहत असल्याने, व्यापाराच्या संबंधातून मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते.

संगमनेर : संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी माल खरेदी विक्रीच्या व्यवसायातून स्थानिक व्यापाऱ्याची परप्रांतिय व्यापाऱ्याशी घनिष्ट मैत्री झाली. आर्थिक देवाण घेवाणीतून विश्वास बसल्याने, आर्थिक व स्नेहसंबंध अधिकच दृढ झाले. मात्र स्थानिकाने विश्वासाने दिलेल्या कांद्यापोटी परप्रांतिय व्यापाऱ्याने दिलेले धनादेश वटला नाही.तो बेईमान निघाल्याने 1 कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथे घडली.

हेही वाचा - इंदोरीकरांसाठी वारकरी झाले धारकरी

या बाबत अधिक माहिती अशी, मनोहर दगडू सातपुते ( वय 38 ), रा. खांजापूर, सुकेवाडी शिवार यांचा शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील ओम साईराम ट्रेडर्स, दादा गणपत केदार, आनंद सोमनाथ तापडे, जय मल्हार ट्रेडींग कंपनी, यश भंडारी अँड कंपनी यांच्याकडून खरेदी केलेला कांदा नवी मुंबईच्या वाशी मार्केटला ते पाठवित असत.

सुमारे तीन चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत कानपूर. फिरोजाबाद, आग्रा, पटना येथे शेतमाल निर्यात करणारा अमनकुमार राजपुत रा. ललई, पोस्टो. खैरगड, फिरोजाबाद ( उत्तर प्रदेश ) हा परप्रांतीय व्यापारी व्यवहार करीत होता.

त्याला विकलेल्या कांदा, कोबी आदी मालाचे दोन-तीन दिवसात रोख पैसे अदा करुन त्याने विश्वास संपादन केला होता. तसेच तो सुकेवाडी येथे राहत असल्याने, व्यापाराच्या संबंधातून मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्याला दिलेल्या 14 मालट्रक कांद्याचे 1 कोटी 20 लाख रुपयांच्या पेमेंटसाठी जानेवारी महिन्यात हे दोघे उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी गेले होते. त्याचा भाऊ मनमोहन राजपुत यांनी देऊ केलेली 50 लाख रुपयांची रोख रक्कम सोबत नेणे जोखमीचे असल्याने, सातपुते यांनी त्यांच्याकडे धनादेशाची मागणी केली. त्यांनी 5 लाख रुपये रोख व 1 कोटी 20 लाख 41 हजार 23 रुपयांचे एचडीएफसी व अँक्सिस बँकेचे तीन धनादेश 25 जानेवारी रोजी दिले. 
त्यानंतर 6 फेब्रुवारी पर्यंत सातपुते यांनी पुन्हा 13 लाख 62 हजार 214 रुपये किंमतीचा तीन मालट्रक माल राजपुत यांना दिला. ही रक्कमही धनादेशाने अदा करण्यात आली. उर्वरीत रक्कम 11 फेब्रुवारी रोजी देण्याचे ठरले होते. मात्र त्यांच्या सुकेवाडी येथील घरी तो मिळून आला नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याने, सातपुते यांनी धनादेश बँकेत दिले असता, संबंधित खात्यात पैसे नसल्याने खाते बंद केल्याची माहिती मिळाली.

या बाबत त्याचा भाऊ मनमोहन राजपुत याला विचारणा केली असता, त्यानेही उडवाउडवीची उत्तरे देत, भावाचे तुम्ही पैशासाठी अपहरण केल्याचा आरोप करुन, पैसे नेण्यासाठी उत्तर प्रदेशला या असे सांगितले. त्यानंतर मात्र दोघांचेही मोबाईल बंद झाले आहेत. यामुळे मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने, सातपुते यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अमन व मनमोहन राजपुत यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They ate one crore onions