जलसंधारणाच्या कामावर श्रमदान करून वाहिली श्रध्दांजली

किरण चव्हाण
रविवार, 22 एप्रिल 2018

तिसऱ्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम संपवून (कै.) पंढरीनाथ यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी लोंढेवाडी येथे पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारणाच्या कामावर श्रमदान करून त्यांना श्रध्दांजली वाहिली.

माढा (जि. सोलापूर) - लोंढेवाडी (ता. माढा)  येथील (कै.) पंढरीनाथ भिकाजी गायकवाड यांच्या निधनानंतरच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम संपवून (कै.) पंढरीनाथ यांच्या पत्नी, मुले, मुलगी, सुना, जावाई, नात, नात अशा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपले दुःख विसरून लोंढेवाडी येथे पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारणाच्या कामावर श्रमदान करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. 'दुनियामे कितने गम है मेरा गम कितना कम है' या गीतातील ओळी सार्थ करणारे हे श्रमदान आहे. 

लोंढेवाडीने पाणी फाऊंडेशनच्या वॅाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सरंपच सारिका लोंढे यांच्या मार्गदर्शनाखील संपूर्ण गाव एकजूटीने श्रमदानात काम करीत असून या ठिकाणी मोठया प्रमाणावर जलसंधारणाचे काम झाले आहे. शुक्रवारी (ता. 20) येथील आयुष्यभर काबाड कष्टाची कामे करणाऱ्या पंढरीनमाथ भिकाजी गायकवाड यांचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी (ता. 21) लोंढेवाडीत माढय़ातील रोटरी क्लबचे पदाधिकार व सदस्य श्रमदानासाठी आले होते. यावेळी रोटरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॅा. सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी डॅा. पाटील यांनी पंढरीनाथ गायकवाड यांनी आयुष्यभर काबाड कष्टाची कामे केली आहेत. कुटुंबाचे दुःख बाजूला सारून रविवारी (ता. 22) तिसऱ्या दिवसाचा विधी उरकल्यानतंर कुटुंबियांनी पाणी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान करावे अशी सुचना केली. यावेळी कुटुंबियांनी ही सुचना मान्य केली. आपल्या कुटुंबावरील दुःखामुळे जलसंधारणाचे काम अडून राहून नये. आपणच दुःख विसरून श्रमदान केल्यास ग्रामस्थांना आणखी प्रेरणा मिळेल व जलसंधारणाच्या कामाचा वेळही वाया जाणारा नाही. म्हणून रविवारी (ता. 22) सकाळी तिसऱ्या दिवसाचा विधी झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने दुःख विसरून श्रमदान केले. ग्रामस्थांनीही दररोजच्या प्रमाणे श्रमदान केले. 

पाण्याअभावी अनेकांना दुःख, यातना व मरण भोगावे लागत असल्याने आपल्या कुटुंबाचे दुःख यापुढे खुजेच माऩून गायकवाड कुटुंबातील (कै.) पंढरीनाथ यांची पत्नी द्रौपदी, मुलगा अरूण, दत्तात्र्य, सुना उषा, सोनाबाई, मुलगी बाळाबाई बोबडे, जावाई अमोल बोबडे, नातू मंगेश, बापूराव, नात राधा अशा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी श्रमदान केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: They give tribute to the work of water conservation