they got rich with onion
they got rich with onion

वावर है तो पॉवर है... "त्यांना' कांद्याने केले मालामाल 

राशीन : शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुलीही देत नाही. वारंवार पडणारा दुष्काळ, बाजारात पिकांची होणारी पडझड या बाबींमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पोरं शेती कसायची सोडून शहरात चार पैशाची नोकरी करायला जातात. परंतु यंदा ज्यांच्याकडे वावर आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, अशी म्हण सोशल मीडियात धुमाकूळ घालते आहे. 

चार कोटींची उलाढाल 
एरवी शेतकरी आणि सामान्य माणसांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यंदा शेतकऱ्यांना चांगलेच मालामाल केले आहे. बाजारपेठेत कांद्याला वाढलेली मागणी आणि त्यामुळे मिळालेल्या दरवाढीने कर्जत तालुक्‍यातील कांदा उत्पादकांची चांदी झाली असून कांद्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची सुमारे चार कोटींची उलाढाल झाली आहे. 

हा भाग झाला मालामाल 
कांद्याला मिळालेल्या बाजारभावामुळे आजही कांदा लावण्याकडेच शेतकऱ्यांचा ओढा असून संपूर्ण कर्जत तालुक्‍यात सुमारे सातशे एकरावर कांद्याचे पिक उभे आहे. प्रतिकिलोस पन्नास रूपयांपासून एकशेतीस रूपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे आले.अळसुंदे, निंबे, डोंबाळवाडी, तसेच धालवडी, बारडगाव सुद्रिक, तळवडी, वायसेवाडी, खैदान, पठारवाडी, गलांडवाडी, वडगाव तनपुरे, भीमा नदीचा बागायतीपट्टा असलेल्या भांबोरे, दुधोडी, खेड, जलालपूर, सिध्दटेक आदी भागातही कांद्याचे उत्पादन मोठया प्रमाणात आहे. या भागातील कांदा उत्पादकांना यंदा चांगला फायदा झाला. 

बांधावर जाऊन खरेदी 
कर्जत तालुक्‍यातून नगर,सोलापूर आणि पुणे येथील बाजारात सर्वात जास्त कांद्याची विक्री करण्यात आली. कांद्याची दरवाढ झाल्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी यंदा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची खरेदी केली. विशेष म्हणजे यावेळेस दरवाढीमुळे प्रतवारी करण्याचे अथवा कांदा वाळविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीच नाही. निघालेला ताजा कांदा थेट व्यापाऱ्यांनी चांगल्या दरात उचलल्याने कांदा उत्पादकांचा फायदा झाला. आजही किरकोळ बाजारात 40 ते 60 रूपये कांद्याला भाव आहे. हा भाव टिकून राहावा ही कांदा उत्पादकांची अपेक्षा आहे. 

काय म्हणतात शेतकरी 
कांद्याला बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शहरातून बांधावर येऊन व्यापारी सौदा करीत आहेत, असे पंडित कोपनर यांनी सांगितले. कांद्यास कायम 40 ते 50 रूपये दर मिळावा. हा दर कायम मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार होईल. कांद्यास निश्‍चित दर मिळाल्यास शेतकरी सुखावेल. कर्जत तालुक्‍यातून सुमारे चार कोटींची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल आणखी वाढेल, असे वाहतूकदार राजेंद्र राऊत यांचे म्हणणे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com