"त्यांच्या'कडे 65 कोटींची थकबाकी 

विनायक लांडे 
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक वर्गवारीनुसार पाच लाख नऊ हजार 503 ग्राहकांकडे सद्यःस्थितीत जवळपास 64 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे.

नगर : महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक वर्गवारीनुसार पाच लाख नऊ हजार 503 ग्राहकांकडे सद्यःस्थितीत जवळपास 64 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. वीज बिलांच्या थकबाकीमुळे ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्या ग्राहकांना पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी थकबाकीसह वीजजोडणीसाठी शुल्क भरावे लागणार आहे, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला. 

शहराकडे थकले 21 कोटी 
नगर ग्रामीण विभागात 71 हजार 459 ग्राहकांकडे सात कोटी 64 लाख, शहर विभागातील एक लाख 45 हजार 898 ग्राहकांकडे 21 कोटी 36 लाख, कर्जत विभागातील 46 हजार 566 ग्राहकांकडे सहा कोटी 41 लाख, संगमनेर विभागात एक लाख 45 हजार 618 ग्राहकांकडे 17 कोटी 57 लाख, श्रीरामपूर विभागात 99 हजार 962 ग्राहकांकडे 11 कोटी नऊ लाख रुपये थकबाकी आहे. नगर मंडळात एकूण पाच लाख नऊ हजार 503 ग्राहकांकडे 64 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे. 

... तर वीजपुरवठा खंडित 
महावितरणकडून वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी मोबाईल, ईमेलवर महावितरणकडून नोटीसही पाठविली जाते. मात्र, महावितरणकडून सांगण्यात आले, की आता नोटीसचा कालावधी संपताच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा वीज जोडणीसाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर पुढील 24 ते 48 तासांच्या अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत जोडणी करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण मंडळाकडून करण्यात आले आहे. 

वसुलीचे मोठे आव्हान 
महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा करूनही थकबाकीदार वीज बिल भरत नाही. त्यामुळे महावितरणसाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यांच्यापुढे वसुली करणे मोठे आव्हान आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे, ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी, यासाठी ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडींग, वीज बिलाचे ग्राहकांना एसएमएसही पाठविले जातात. मात्र, वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव महावितरणने कठोर पावले उचलली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They have an outstanding balance of 65 crores