त्यांना हवेत 45 कोटी 

सचिन सातपुते
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

शेवगाव तालुक्‍यातील सहा महसूल मंडळांतील गावांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण केले. 59705.46 हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 73 हजार 778 आहे.

शेवगाव : ""तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना भरपाईसाठी 45 कोटी 43 लाख रुपयांची मागणी करणारा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांतर्फे सरकारकडे सादर केला आहे,'' अशी माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली. 

परतीच्या पावसाने शेवगाव तालुक्‍यातील बाजारी, कपाशी, सोयाबीन, कांदा, भूईमूग या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठे नुकसान झालेले आहे. शेवगाव तालुक्‍यातील सहा महसूल मंडळांतील गावांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण केले. 59705.46 हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 73 हजार 778 आहे.

बाधित क्षेत्रात सर्वाधिक 46697.46 हेक्‍टरवर कपाशीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल बाजरी 6142 हेक्‍टर, कांदा 5950 हेक्‍टर, डाळिंब 451 हेक्‍टर, मोसंबी 151 हेक्‍टर, केळी 131 हेक्‍टर, संत्री 78 हेक्‍टर, भुईमूग 75 हेक्‍टर, तर तुरीच्या 20 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी, शेवगाव तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तहसीलदार डॉ. विनोद भामरे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी संयुक्त पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर केले. सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त विद्यमाने पंचनामे केले. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व भागातील पंचनामे लवकर पूर्ण झालेले आहेत.

शेवगाव तालुक्‍यात खरीप पीकविमा असलेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या 70 हजार 144 असून, 39 हजार 692.49 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेला आहे. 

प्रशासनाकडून खबरदारी 
शेवगावमधील पंचनामे करताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. यामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले आहेत. 

शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी 
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर गेले होते. सर्व अधिकारी प्रथमच पंचनाम्यांसाठी एकत्र शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले आहेत. 

नुकसान भरपाईची प्रतीक्षा 
पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केलेले असून त्याचा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. मात्र या नुकसानीची भरपाई कधी मिळणार आहे, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी अपेक्षा सर्वांमधून व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They need 45 crores