सुटीत परगावी जाताय?, चोरी, घरफोडी टाळण्यासाठी राहा दक्ष!

परशुराम कोकणे
मंगळवार, 1 मे 2018

तुम्ही कुटुंबासह गावाला जाणार असाल तर पोलिसांना माहिती द्या. विश्‍वासू शेजारी आणि नातेवाइकांनाही कल्पना द्या. घराकडे लक्ष राहू द्या, असे त्यांना सांगा. घरात मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड ठेवू नका. आजवर काही झाले नाही म्हणून बिनधास्तपणे जाऊ नका. उन्हाळ्याच्या काळात बेरोजगारीमुळे चोरीच्या घटना वाढतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहायला हवे. 
- रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक

सोलापूर : आजवर आमच्या भागात कधीच चोरी झाली नाही..! असे म्हणत लोक बिनधास्त घर बंद करून सुटीत गावाला निघून जातात. उन्हाळ्याच्या सुटीत कॉलनी, अपार्टमेंटमध्ये दोन-चार घरे बंद दिसतातच. अशाच घरांवर लक्ष ठेवून चोरटे डल्ला मारतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे. 

मे-जून महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेरोजगारीमुळे चोऱ्यांमध्ये वाढ होते. गावाला जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवायला हवी. शक्‍य असेल तर घरात आवाज येण्यासाठी सायरन सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अपार्टमेंट, कॉलनीमध्ये सुरक्षारक्षक नेमावेत. काहीही कामधंदा नसलेली तरुण मुले, व्यक्ती "पॉश'मध्ये राहात असतील तर अशांवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यायला हवी, अशी मंडळी चोरी करून ऐश करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

ही घ्या खबरदारी... 
- गावी जात असाल तर घरात सोने, रोकड ठेवू नका. 
- दागिने, रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. 
- संशयित हालचाली दिसल्या तर पोलिसांना तत्काळ कळवा. 
- रात्रीच्या वेळी बाहेरगावी जाणार असाल तर घरामधील लाइट चालू ठेवावी. कारण, घरात कोणी आहे किंवा नाही, याचा चोरास अंदाज येत नाही. 

फेसबुक चेकइन धोक्‍याचे 
अलीकडे बहुतांश मंडळी गावाला गेल्यावर फेसबुकसह इतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. चेकइन करून आपण कोठे आणि कोणासोबत आहोत, हे फेसबुकवर शेअर केले जाते. आपल्या घरात कोणी नाही, हे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांना सहज समजते. चोरी करण्याच्या उद्देशाने लक्ष ठेवून असलेल्यांना ही आयती संधी असते. सोशल मीडियावरचे अपडेट पाहून चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तुम्ही कुटुंबासह गावाला जाणार असाल तर पोलिसांना माहिती द्या. विश्‍वासू शेजारी आणि नातेवाइकांनाही कल्पना द्या. घराकडे लक्ष राहू द्या, असे त्यांना सांगा. घरात मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड ठेवू नका. आजवर काही झाले नाही म्हणून बिनधास्तपणे जाऊ नका. उन्हाळ्याच्या काळात बेरोजगारीमुळे चोरीच्या घटना वाढतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहायला हवे. 
- रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: thief in Solapur