कोल्हापूर : चोरट्यांचा महिलेवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर : चोरट्यांचा महिलेवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर- बंद घराची कडी काढून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील महिलेला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नंदिनी सिद्धेश वाकुडे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील रोकडसह सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. जिवबा नाना पार्क येथे काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः नंदिनी वाकुडे या पती सिद्धेश, मुलगा हर्षवर्धन, मुलगी दीक्षा यांच्याबरोबर महालक्ष्मी पार्क, एमएसईबी टॉवर, जिवबा नाना पार्क येथे भाडेकरू म्हणून राहतात. त्यांचे पती कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. काल सकाळी ते कपडे विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची पत्नी नंदिनी व दोन मुलेच होती. मध्यरात्री त्यांच्या घराच्या खिडकीचे गज लाकडी दांडक्‍याच्या सहायाने उचकटून दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी आतून काढली व ते घरात शिरले. याची कुणकूण नंदिनी यांना लागली. त्या जाग्या झाल्या. दरम्यान, त्यातील एका चोरट्याने त्यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात त्यांचे दातही पडून तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी जोराने ओरडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना दोन्ही मुलांना मारण्याची धमकी दिली.

यानंतर चोरट्यांनी घरातील तिजोरी उघडून त्यातील साहित्य विस्कटण्यास सुरवात केली. चोरट्यांच्या हाती कपाटातील पाच हजारांची रोकड व किमती ऐवज लागला. ते घेऊन चोरटे बाहेरून कडी घालून तेथून पसार झाले. घडलेल्या या प्रकारामुळे वाकुडे घाबरून गेल्या. त्यांनी स्वतःला सावरत फोनवरून घरमालक कृष्णा पारखे यांना माहिती दिली. त्यांनी वाकुडे यांच्या घरी धाव घेऊन याची माहिती त्यांच्या पतीसह करवीर पोलिसांना दिली. 

या प्रकारानंतर पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहकाऱ्यांबरोबर घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी उपलब्ध माहितीनुसार तातडीने लुटारूंचा शोध सुरू केला. 

लुटारू परप्रांतीय असल्याचा संशय...
दोघेही लुटारू एकमेकांशी हिंदीतून बोलत होते. ‘चिल्लाने का नहीं, इधर-उधर हिलना मत, नहीं तो मार दूँगा’ अशी त्यांची भाषा होती, असे जखमी वाकुडे यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून लुटारू परप्रांतीय असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. 

भीतीचे वातावरण
बंद घरावर लक्ष्य केंद्रीत करून चोरट्यांनी केलेल्या घरफोड्यांचे प्रकार आता नवे नाहीत. पण, घरात माणसं असतानाही चोरटे प्राणघातक हल्ला करून लूट करीत असल्याच्या या प्रकारामुळे उपनगरवासीयांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com