कोल्हापूर येथील सात घरे फोडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

काेल्हापूर येथील जौंदाळ मळ्यातील पुरग्रस्तांची बंद घरे चोरट्यांनी फोडली. सात घरांतील 15 तोळे दागिन्यांसह 65 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

वडणगे (काेल्हापूर) : येथील जौंदाळ मळ्यातील पुरग्रस्तांची बंद घरे चोरट्यांनी फोडली. सात घरांतील 15 तोळे दागिन्यांसह 65 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, जौंदाळ मळ्यातील घरात पुराचे शिरल्याने अनेक कुटूंबे घरांना कुलूपे घालून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. आज पुराचे पाणी ओसरल्यानंतर यातील काही कुटूंबातील नागरिक घराची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना घराचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आले. घरात जाऊन त्यांनी पाहणी केली असता चोरीचा प्रकार समोर आला.

अज्ञातांनी घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी संपत जौंदाळ यांच्या घरातील सोन्याचे मंगळसूत्र, तीन अंगठ्या ,चैन,  सरमाळ, असे सहा तोळे दागिने व पाच हजारांची रोकड चोरून नेली. विश्वास जौंदाळ यांच्या घरात वरच्या मजल्यावर असलेल्या तिजोरीतील लहान मुलांच्या दागिन्यांसह चार तोळे चोरीला गेले. बाळासाहेब जौंदाळ यांनी मुलाची शैक्षणिक फी भरण्यासाठी सोने तारण ठेऊन पन्नास हजार रुपये आणले होते. ती रक्कमही चोरट्यांनी लांबवली.

दरम्यान, माणिक जौंदाळ यांच्या घरातील सहा ग्रँमचे दागिने, इस्त्री, संगणक साहित्य चोरीला गेले आहे. दिलीप जौंदाळ, जाणिक  जौंदाळ यांची बंद घरेही चोरट्यांनी फोडली आहेत. बाळासाहेब शेलार यांच्या घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये लंपास केले. एकूण सात घरातील मिळून 15 तोळे दागिने व 65 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. करवीर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पुरग्रस्तांच्या बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves broke down closed houses in flood affecated area