थर्डपार्टी विमा हप्त्यात ४० टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये विमा कंपन्या अडचणीत आल्यामुळे निर्णय 
सातारा - वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्याच्या रकमेत १६ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विमा नियमक आयोगाने ही दरवाढ केली आहे. अपघातानंतर थर्डपार्टी विमा असलेल्या वाहनांच्या ‘क्‍लेम सेटलमेंट’मध्ये मोठ्या रकमा द्याव्या लागत असल्याने विमा कंपन्या अडचणीत आल्या आहेत. यावर पर्याय म्हणून विमा हप्त्यांत ही दरवाढ करण्यात आली असून, ती एक एप्रिलपासून लागू होणार आहे.  

नवीन वाहन घेतल्यानंतर पहिल्या वर्षभरासाठी वाहनाच्या विम्यासाठी संपूर्ण रक्कम स्वीकारली जाते; पण बहुतांशी खासगी वाहनधारकांकडून दुसऱ्या वर्षांपासून पूर्ण विमा रक्कम भरण्याचे टाळून थर्डपार्टी विमा घेतात. यातून केवळ विमा हप्त्यापोटी भरावी लागणारी रक्कम कमी होऊन पैसे वाचावेत हा उद्देश राहतो; पण विमा संरक्षणाच्या बाबतीत थर्ड पार्टी विम्यात दुचाकी किंवा चारचाकी वाहनांकडून दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीची भरपाई होते. संबंधित वाहनधारकाला काहीही भरपाई मिळत नाही. अनेकदा अपघात झाल्यावर वाहनाच्या थर्डपार्टी विम्यातून नुकसान झालेल्या किंवा मृत झालेल्या व्यक्तीला मदत मिळण्यासाठी संबंधित कंपनीकडे क्‍लेम केला जातो. हा क्‍लेम सेटल करताना मृत व्यक्तीला मिळणारी भरपाई ही काही लाखांत किंवा कोटीत जाते. अशा वेळी विमा कंपनीला काही किरकोळ हप्त्यातून लाखांत किंवा कोटीत भरपाई संबंधित व्यक्तीला द्यावी लागते.

या थर्ड पार्टी विम्यातून विमा कंपन्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. याचा विचार करून इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने म्हणजे विमा नियामक आयोगाने थर्डपार्टी विमा हप्ता रकमेत १६ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम जुन्या वाहनाचा थर्ड पार्टी विमा काढणाऱ्यांवर होणार आहे. त्यामध्ये दुचाकी, खासगी चारचाकी व व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे. वाहनाच्या प्रकारावर विमा हप्ता रकमेत वाढ केलेली आहे. त्यामुळे थर्डपार्टी विमा महाग झाला आहे. जुन्या वाहनांसाठी पूर्ण रकमेचा विमा घेण्यास का कू करणाऱ्यांना थर्डपार्टीचा विमा घेतानाही खिशाला चाट पडणार आहे.

थर्डपार्टी विमा असलेल्या वाहनांचा अपघात झाल्यानंतर समोरील वाहन व व्यक्तीस नुकसान पोचले असल्यास त्यांचा क्‍लेम सेटलमेंट करताना अवाजवी किमतीचा क्‍लेम सेटल केला जातो. यातून विमा कंपनीला फटका बसतो. यावर विमा कंपन्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन नियमावली करणे गरजेचे आहे. 
- सचिन शेळके, संचालक, गजानन सुझुकी, सातारा

थर्डपार्टी विमा हप्ता रकमेत वाढ स्थिती 
दुचाकी वाहन : १६ ते ४० टक्के
खासगी वाहन : ४० टक्के
व्यावसायिक वाहने : ४० टक्के

Web Title: third party insurance installment 40 percent increase