"थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची जोरदार तयारी 

"थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची जोरदार तयारी
"थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची जोरदार तयारी

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोपाच्या तयारीला आता वेग आला असून, इनडोअर पार्टीच्या जल्लोषासह सोहळ्याला विविध सामाजिक उपक्रमांची झालरही लाभणार आहे. तरुणाईच्या विविध ग्रुप्सनी ठिकठिकाणी जल्लोष पार्टीचे आयोजन केले असून, शनिवारी (ता. 31) सायंकाळी सातपासूनच या जल्लोषाला उधाण येणार आहे. त्याशिवाय बालकल्याण संस्था, वृद्धाश्रमांसह विविध ठिकाणी स्नेहमेळाव्यांचे आयोजन करून तेथेही छोटेखानी समारंभ होणार आहेत. 

दरम्यान, यंदाचा थर्टी फर्स्ट शनिवारी आल्याने विविध हॉटेल्समध्ये मांसाहारासह शाकाहारी मेन्यूंवरही भर असेल. त्याशिवाय विविध फॅमिली पॅकेजिसही जाहीर झाली आहेत. शहर परिसरात विविध ठिकाणी सुरू झालेल्या हॉटेल, रिसॉर्ट आणि ढाब्यांवरही यंदा थर्टी फर्स्टची धूम असेल. म्युझिकल शो, डान्स पार्टीचे येथेही आयोजन होणार आहे. कोल्हापूर आणि मांसाहार हे एक समीकरणच असल्याने शनिवार, रविवार सलग दोन दिवस मांसाहाराचा बेत फत्ते केला जाणार आहे. 

मिळून साऱ्या  जणींचे सेलिब्रेशन...! 
"तुम्ही कुठे जेवायला जायचे तिकडे जा. आम्ही मिळून साऱ्या जणीही आता सेलिब्रेशन करणार...' असा निर्णय यंदाही शहरातील काही पेठांतील महिलांनी घेतला असून, त्यांचेही थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन यंदाही रंगणार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी शनिवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरातून पुढे आलेली ही संकल्पना आता सर्वत्र मूळ धरू पाहत आहे. 
घरातील महिला आणि मुलींनी केवळ टीव्हीवरचे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतच थर्टी फर्स्ट साजरा का करायचा, असा एक प्रवाह महिला वर्गातून पुढे आला आणि स्नेहभोजनाची संकल्पना पुढे आली. गल्लीच्या दोन्ही बाजूला कनात मारून आपापल्या घरातून जेवण आणायचे आणि सर्व महिला व मुलींनी मिळून एकत्र त्याचा आस्वाद घ्यायचा. कुणाला वाटलेच, तर एखादा मोठा टीव्ही बाहेर आणायचा आणि त्यावरील मनोरंजनाचे कार्यक्रम एकत्रपणे पाहायचे. कुणाला नकला येत असतील, कुणाला कविता वाचायची असेल किंवा कुणाला एखादा चित्रपटातील प्रसंग सादर करायचा असेल, तर त्यांचे येथे स्वागतच असते. एकूणच मिळून साऱ्या जणींचा हा आनंदोत्सव सुरू असतो; मात्र त्याचा त्रास कुणालाही होणार नाही, याची खबरदारी हमखास घेतली जाणार आहे. 

- असेही संकल्प 
सोशल मीडियावरही थर्टी फर्स्टची धूम असून यंदा प्रबोधनात्मक संदेशांवरही अधिक भर दिला जातो आहे. गड-किल्ले आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांच्या जतन व संवर्धनाचा जागर यानिमित्ताने नेटिझन्सनी मांडला आहे. फेसबुक आणि व्हॉट्‌स ऍपवरून अशा आशयाचे संदेश आता शेअर होऊ लागले आहेत. "कोणी काहीही म्हणत असले तरी सत्य हेच राहील, की आपला वारसा आपण जपला पाहिजे. आपणच जर याची कदर नाही केली तर आपला इतिहास आपणच पुसून टाकला हे पण इतिहासातच लिहावे लागेल', असे भावनिक आवाहन केले जाऊ लागले आहे. 

- आध्यात्मिक अनुभूती 
नववर्षाचे स्वागत अक्कलकोट येथे करण्यासाठी शुक्रवारी (ता. 30) सकाळपासूनच येथून अनेक वाहने अक्कलकोटकडे रवाना होतील. 31 डिसेंबरची रात्र तेथे भजनात जागणार असून, एक जानेवारीला सकाळी नव्या वर्षाचा संकल्प केला जाणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून कोल्हापुरातील स्वामी समर्थ भक्तांनी ही परंपरा जपली असून, यंदा सुमारे 12 ते 15 हजारांहून अधिक भाविक अक्कलकोटकडे रवाना होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com