जिल्ह्यात तीस ठिकाणी आज चक्का जाम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सातारा - विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवारी) जिल्ह्यातील तब्बल 30 ठिकाणी अकरा ते एक या वेळेत चक्का जाम आंदोलन होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस दलही सज्ज झाले आहे. शांततेच्या मार्गाने संपूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

सातारा - विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवारी) जिल्ह्यातील तब्बल 30 ठिकाणी अकरा ते एक या वेळेत चक्का जाम आंदोलन होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस दलही सज्ज झाले आहे. शांततेच्या मार्गाने संपूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोपर्डी प्रकरणातील भगिनीला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच ऍट्रासिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, यासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढत मराठा समाजाने जगासमोर आदर्श उभा केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईत मार्चमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी शासनाला मागण्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 

याठिकाणी होणार आंदोलन 

शिरवळ - शिरवळ चौक, खंडाळा - पारगाव चौक, पाचवड - आनेवाडी टोल नाका, सातारा - वाढे फाटा, उंब्रज - तळबीड टोलनाका, दहिवडी - पिंगळी चौक, कऱ्हाड - कोल्हापूर नाका पुसेगाव - शिवाजी चौक, कोरेगाव - आझाद चौक, रहिमतपूर - रहिमतपूर चौक, फलटण - फलटण चौक, लोणंद - बस स्थानकासमोर, वाठार - रस्त्यावर, मेढा - बाजार चौक, पाटण - जुने स्टॅंड, वाई - बावधन नाका, म्हसवड - म्हसवड चौक, डिस्कळ - शिवाजी चौक, वडूज - शिवाजी चौक, कातरखटाव - कात्रेश्वर चौक, मायणी - चांदणी चौक, विखळे फाटा - शिवाजी चौक, पुसेसावळी - दत्त चौक, चौकीचा आंबा - प्रतापराव गुजर चौक. 

मोठा पोलिस बंदोबस्त 

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील समन्वयंकांची बैठक घेऊन चर्चा केली आहे, तसेच आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणीही करण्यात आली. पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जोडीला पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिक बंदोबस्तही तैनात केला आहे. त्यामध्ये आठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, 109 कर्मचारी, 400 होमगार्ड, वाहतूक शाखेचे दहा कर्मचारी, आठ स्ट्रायकिंग फोर्स, जलद कृती दलाच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. आंदोलन स्थळी वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहनेही तैनात करण्यात येणार आहेत. 

आंदोलनादरम्यान हे करा 

- नेमून दिलेल्या ठिकाणीच सहभागी व्हा 
- अग्निशमन दल, रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून द्या 
- शिस्तबद्ध राहा; कोणतेही गालबोट लावू नये 
- संशयित दंगेखोराची माहिती पोलिसांना द्या 
- वाहनांवर दगडफेक करू नये 
- वाहनांची हवा सोडू नये 
- रस्त्यावर टायर पेटवू नये 
- पोलिसांना सहकार्य करा 

Web Title: Thirty places in the district today chakka jam