भाजपने कोरोनाचाही इव्हेंट केला, मोदींच्या दिवे पाजळण्याच्या आवाहनावर बाळासाहेब भडकले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलिस व प्रशासन यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे.

संगमनेर ः देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देश एका गंभीर संकटाचा सामना करीत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर होवून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही. आतातरी त्यांनी गंभीर व्हायला हवे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमावर केलेल्या वक्तव्याचा समाचार मंत्री थोरात यांनी घेतला. ते म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलिस व प्रशासन यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध करणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांना आवश्यक असलेले सुरक्षा कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारांना जास्तीत जास्त मदत करणे, जनतेला धीर देणे, त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे. दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान सिरिअस दिसत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. 

तर देशाला मोठी किंमत मोजावी लागेल
राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते. दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात असल्य़ाची टीका थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorat criticizes PM Narendra Modi