हजार, पाचशेच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

इस्लामपूर - येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून, तर या प्रकरणातील अन्य दोघे असे चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हजार आणि पाचशेच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. 

इस्लामपूर - येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून, तर या प्रकरणातील अन्य दोघे असे चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हजार आणि पाचशेच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. 

याप्रकरणी दत्तासिंग हरिसिंग हजारे (वय १८, रा. किल्लेमच्छिंद्रगड), रमेश मोहनराव पाटील (रा. नरसिंहपूर), दीपक प्रल्हाद बाकले (वय ३४, रा. जुळेवाडी, ता. कऱ्हाड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद झाला आहे. यातील हजारे व बाकले यांना ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिलेली माहिती अशी, दत्तासिंग हजारे व अल्पवयीन तरुण हे चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन इस्लामपूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जुन्या तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. सायंकाळी सहाच्या सुमारास हजारे व अल्पवयीन तरुण हे ताकारी रस्त्याकडून मोटारसायकलवरून (एमएच १०, डीबी ८१६२) हॉटेल शुभम येथे आले.

पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याकडील सॅग व बॅगमध्ये हजार आणि पाचशेच्या ९९ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या. जुळेवाडी (ता. कराड) येथील दीपक बाकले व नरसिंहपूर येथील रमेश मोहनराव पाटील यांच्या मालकीच्या या नोटा असून, त्या बदलण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हजारे व अल्पवयीन तरुण यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९९ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या नोटा व एक मोटारसायकल, दोन मोबाईल असा एकूण सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर दीपक बाकले यालाही रेठरे कारखाना परिसरातून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक आशीतोष चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

रमेश पाटील रुग्णालयात 
या प्रकरणातील संशयित रमेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याला सांगली येथे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousand and five hundred rs old currency seized in Islampur