हजारो श्री सदस्यांनी केली स्मार्ट सिटी चकाचक! 

परशुराम कोकणे
रविवार, 13 मे 2018

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री अाप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिका प्रशासनानेही आम्हाला अभियानासाठी सहकार्य केले. आता लवकरच वृक्ष लागवडीच्या मोहीमेला सुरवात होईल. 
- अॅड. उमेश भोजने, श्री सदस्य

सोलापूर : जय सद्‌गुरु.. म्हणत एकमेकांचा आदर करणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी रविवारी स्मार्ट सिटी सोलापूर चकाचक केली. यावेळी श्री सदस्यांनी ना सेल्फी, ना फोटोग्राफी...कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता शहरातील विविध भागात उत्साहाने स्वच्छता केली. 

शिवाजी चौकात सकाळी सातच्या सुमारास महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, देवेंद्र कोठे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, श्री सदस्य रंगनाथ कुलकर्णी, अॅड. उमेश भोजने, रंगनाथ कुलकर्णी, अॅड. सोपान शिंदे, संजय पवार, संजय तिऱ्हेकर, एच.एम.गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरवात झाली.

शहरात विविध भागात ठरलेल्या ठिकाणी सकाळी अगदी वेळेवर श्री सदस्य एकत्र आले. नाकाला रुमाल बांधून, हातात झाडू घेऊन स्वच्छतेची सुरवात केली. परिसर चकाचक करण्यात आला. वेळेसोबत उन्हाचा चटकाही वाढत होता, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह कायम होता. कोणीच सेल्फी काढताना, फोटोग्राफी करताना दिसत नव्हता.

सकाळी सातच्या सुमारास सुरु झालेले स्वच्छता अभियान दुपारी बारापर्यंत चालले. शहरातील 21 हजार 522 हून अधिक श्री सदस्यांनी या सहभाग नोंदविला. 49 शासकीय कार्यालयांच्या परिसरातही स्वच्छता करण्यात आली. 
 
स्वच्छतेची एकूण ठिकाणे - 45 
स्वच्छता केलेले एकूण अंतर - 262 किलोमीटर 
शासकीय कार्यालयात स्वच्छता - 49 
हजेरी दिलेल्या सदस्यांचा आकडा - 21 हजार 522 
एकूण कचरा संकलन - 406 टन 
ओला कचरा - 22 टन 
सुका कचरा - 385 टन 
कचरा उचलण्यासाठी टॅक्‍टर - 135

Web Title: Thousands of Shree Members have clean Smart City