तिन्ही आरोपींविरुद्ध दोषारोप निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयाने तीन आरोपींविरुद्ध बलात्कार, कट रचणे, विनयभंग, बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये दोषारोप निश्‍चित केले. 

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयाने तीन आरोपींविरुद्ध बलात्कार, कट रचणे, विनयभंग, बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये दोषारोप निश्‍चित केले. 

जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25), संतोष भवाळ (वय 28), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 27, सर्व रा. कोपर्डी, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. कोपर्डी बलात्कार व खून खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. काल आरोपी हजर नसल्याने न्यायालयाने आज सुनावणी ठेवली होती. पोलिसांनी आज दुपारी न्यायालयासमोर आरोपींना हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना समोर बोलावले. आरोपी जितेंद्र शिंदे याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. त्यासाठी आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनी मदत केल्याने तुमच्याविरुद्ध कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवला आहे, तसेच विनयभंग व बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप ठेवला आहे. 

आरोप मंजूर आहेत का? असे न्यायालयाने विचारले. त्यावर आरोपींनी, नाही असे उत्तर दिले. न्यायालयाने आरोपींना तुमचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला जाईल, असे सांगितले. 

आरोपीचे वकील प्रकाश आहेर म्हणाले, ""आरोपी बरेच दिवस कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण आला आहे. त्यांची मानसशास्त्रीय चाचणी करावी.'' मात्र, न्यायालयाने त्यांचे म्हणणे खोडून काढत, तशी काही गरज वाटत नसल्याचे सांगितले आणि कोठडीमध्ये तसे काही निदर्शनास आले नसल्याचेही सांगितले. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना 22 रोजी म्हणणे मांडण्यास सांगितले. 

दोषारोप निश्‍चित झाल्याने 20 ते 23 डिसेंबर अशी सलग चार दिवस पुढील सुनावणी ठेवली आहे. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर यांनी काम पाहिले. दरम्यान, आरोपी नितीन भैलुमे याचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केला आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे. 

जिल्ह्याबाहेर खटला हलविण्यासाठी अर्ज 

आरोपी नितीन भैलुमे याचे वकील ऍड. प्रकाश आहेर यांनी आज खटला दुसऱ्या जिल्ह्यातील न्यायालयात हलवावा, असा अर्ज केला. आरोपींना अटक करून न्यायालयात आणल्यानंतर त्यांच्यावर अंडे, चप्पल फेकली होती. आजही आरोपींना सुनावणीसाठी न्यायालयात आणल्यानंतर आजूबाजूला बसलेले लोक धमकी देतात, शिव्या देतात, असे न्यायालयास सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचे आरोप फेटाळून न्यायालयात चांगला पोलिस बंदोबस्त असल्याचे सांगितले. तसेच खटला दुसऱ्या जिल्हा सत्र न्यायालयात हलविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अर्ज करावा, असे आरोपींच्या वकिलांना सांगितले. 

Web Title: three accused, fixed charge