साडेतीनशे बेवारस वाहनांचा होणार लिलाव; सांगली पोलिसांचा निर्णय

Three and a half hundred unattended vehicles to be auctioned; Sangli police decision
Three and a half hundred unattended vehicles to be auctioned; Sangli police decision

सांगली ः गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या दारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी अशा 348 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही वाहने मूळ मालकांनी मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा, तारण, विमा हक्क याबाबतचे मूळ दस्ताऐवज दाखवून घेऊन जावी. त्यानंतर सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जाहीर केले आहे. 

विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेल्या दुचाकीसह वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात लावून ठेवली आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेकांनी वाहने सोडवून घेण्याची तसदीच दाखविलेली नाही. अपघातातील वाहने पुन्हा घरी नको, ती पोलिस ठाण्यातच राहू दे, असा मानसिकतेखाली अनेक अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्याच्या दारात वर्षानुवर्षे सडत पडली आहेत. 

उन्हाळा, पावसाळ्यात ती उघड्यावरच पडल्याने सडून, गंजून गेली आहेत. जिल्ह्यातील सांगली शहर, ग्रामीण, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर, ग्रामीण, कुपवाड, महात्मा गांधी चौकी, इस्लामपूर, आष्टा, शिराळा, कुरळप, कासेगाव, कोकरूड, तासगाव, कुंडल, पलूस, भिलवडी, विटा, आटपाडी, कडेगाव, चिंचणी वांगी, जत, कवठेमहांकाळ, उमदी, वाहतूक शाखा, एलसीबी अशा 28 ठिकाणी वाहनांचा ढीग साचल्याने पोलिस ठाण्यांचा श्‍वास कोंडत आहे. 

पावसाचे पाणी या गाड्यांत साचून राहिल्याने डेंगीसह विविध साथीच्या आजारांचा सामनाही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावा लागतो आहे. चांगली वाहने अनेक वर्षे पडून रहिल्याने निकामी झाली आहेत. त्यांना वापरात आणता येणार नाही, अशी बिकट अवस्थाही अनेक वाहनांची झाली आहे. सुमारे 303 दुचाकी, 13 तीनचाकी, 18 चारचाकी आणि 2 सहाचाकी अशा सुमारे 348 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस अधीक्षक गेडाम यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

साठ दिवसांनी संबंधित वाहनांवर हक्क सांगता येणार नाही

जाहीनाम्यात प्रसिद्ध केलेल्या वाहनांबाबत आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देऊन वाहन घेऊन जावे. साठ दिवसांनी संबंधित वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही. या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. 
- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली 

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com