कोल्हापूर : बेकायदा शस्त्रांची तस्करी प्रकरणी तिघांना अटक

कोल्हापूर : बेकायदा शस्त्रांची तस्करी प्रकरणी तिघांना अटक

कोल्हापूर - बेकायदा शस्त्रांची तस्करी आणि वापर करणाऱ्या तीन अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल, 11 राऊंड व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख अकरा हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शुभम शांताराम शिंदे (वय 25 रा. अर्जुनवाड, ता. गडहिंग्लज), आदिनाथ तुकाराम बडेकर (वय 38, रा. बीड खुर्द, ता. जाबरुंग, जि. रायगड) आणि शर्मेश रोहिदास राठोड (वय 32, कामोठे, नवी मुंबइ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीतून शस्त्रास्त्र तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता आहे,  अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज दिली. 

देशमुख म्हणाले, "गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना शस्त्रास्त्र खरेदी विक्रीतील सराईत गुन्हेगार शुभम शिंदे हा शस्त्रास्त्र विकण्यासाठी कागल येथे येणार असल्याची पक्की माहिती होती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. यामध्ये हेड कॉन्स्टेबल इकबाल महात, कॉन्स्टेबल असिफ कलायगार, तुकाराम राजीगरे यांचा सहभाग होता.

मंगळवारी (ता.10) शुभम शिंदे पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी फाटा येथे आला. शुभमकडून पिस्टल खरेदी करण्यासाठी आदिनाथ बडेकर आला होता. या दोघांनाही पोलीस पथकाने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून 4 गावठी पिस्टल आणि 7 राउंड हस्तगत केले. तसेच 9,200 रुपयांची रोकडही हस्तगत केली. या दोघांकडे कसून चौकशी केली असता बडेकरने शुभम शिंदे याच्याकडून यापूर्वी खरेदी केलेले 2 पिस्टल आणि 4 राऊंड नवी मुंबई येथील शर्मेश राठोड याला विकल्याचे सांगितले.

शर्मेश याला अटक केल्यावर त्याच्याकडून 2 पिस्टल आणि 4 राऊंड ताब्यात घेण्यात आले. याबाबतचा गुन्हा गोकूळ शिरगाव पोलीसात दाखल झाला असून या तिघांकडून एकूण 6 पिस्टल, 11 राऊंड व 3 लाख 11 हजार 31 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी उपस्थित होते. 

तिघेही सराईत गुन्हेगार 
आरोपी शुभम शिंदे याच्यावर यापूर्वी चंदगड पोलीसात शस्त्रास्त्र तस्करीचा गुन्हा दाखल आहे. शर्मेश राठोड याच्यावर कळंबोली पोलीसात 3 तर सी. बी. डी पोलीसात एक गुन्हा दाखल आहे. आदिनाथ बडेकर याच्यावर कर्जत पोलीसात तीन अलिबाग आणि खोपोली पोलीसात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. फसवणूक, शस्त्रास्त्र तस्करी, खूनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. विशेष म्हणजे आदिनाथ बडेकर हा शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी सात वर्षांची शिक्षा भोगून आला आहे. 

बॅलेस्टीक अहवाल महत्त्वाचा 
जप्त करण्यात आलेल्या 6 पिस्टलचा बॅलेस्टिक अहवाल पोलिसांनी मागवला आहे. त्यातून ही पिस्टले किती वेळा वापरली गेली आहेत याची माहिती मिळेल. त्यातून बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. ही पिस्टल परराज्यातून आणली असावीत, असा पोलिसांचा संशय असून पिस्टल तयार करणाऱ्यांपर्यंत तपास केला जाईल. असे श्री. देशमुख यांनी सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com