
2020 या वर्षाला निरोप देताना तसेच 2021 या नववर्षाचे स्वागत करताना अनेक पर्यटकांची पावले चांदोली परिसराकडे वळतात.
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण 30 डिसेंबर ते 1 जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. याची चांदोलीला येणाऱ्या पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल गोविंद लंगोट व धरण व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.
2020 या वर्षाला निरोप देताना तसेच 2021 या नववर्षाचे स्वागत करताना अनेक पर्यटकांची पावले चांदोली परिसराकडे वळतात. यामध्ये काही पर्यटक अतिउत्साही असतात. त्यांचा दंगा, गोंगाट, जल्लोषामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव तसेच वन्यजीवांची आश्रयस्थळे यांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. उद्यानातील वन्यजीवांचा धोका टाळण्यासाठी तसेच धरण परिसरात ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर चांदोलीकडे पर्यटकांचा कल वाढलेला आहे. या निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारण्यासाठी अनेक अनेकजण आपल्या कुटुंबासमवेत येत आहेत. परंतु सध्या 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक हौशी युवा वर्ग पर्यटनाच्या तयारीत आहेत. अनेकवेळा पर्यटनाचा मुख्य हेतू बाजूला राहून गैरप्रकार होण्याच्या घटना घडतात.त्यामुळे चांदोली पर्यटन तीन दिवस बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा - घर पत्र्याचे अन् वीज बील तब्बल 93 हजार रुपये
शनिवारपासून (ता. 2) धरण व चांदोली उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे याची पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोली वन्यजीव विभाग तसेच धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे