गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीजवळ अपघातात ३ ठार

गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हरळीजवळ अपघातात ३ ठार

गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 

सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता. कागल), विशाल पांडुरंग पाटील (गोकुळ शिरगाव), सूरज भरमा पाटील (बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीतील संदेश सदाशिव तिप्पे (तमनाकवाडा) याच्यावर खासगी दवाखान्यात तर आदिनाथ साहेबराव खुडे याच्यावर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबतची माहिती अशी, सूरज तिप्पेसह चौघे जण मोटारीतून (एमएच ०९, बीएम ८६१९) चंदगडकडून गडहिंग्लजकडे येत होते. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हरळी बुद्रुक येथे इंचनाळ फाट्याजवळ लघुशंकेसाठी मोटार थांबवली होती. 

इतक्‍यात मागून भरधाव वेगात चंदगड तालुक्‍यातील एका कारखान्याचे मोलॅसिस घेऊन मुंबईला जाणाऱ्या कंटेनरने (एमएच ४६, बीबी ६४९९) थांबलेल्या या मोटारीला जोराची धडक देऊन उडवले. ही धडक इतकी जोरात होती, की पुढे जाऊन कंटेनरही कोसळला. मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता, की हरळीतील ग्रामस्थ झोपेतून जागे झाले. रस्त्याकडील घरांमधून बाहेर आलेल्या ग्रामस्थांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांनीच चक्काचूर झालेल्या मोटारीतील गंभीर जखमींना बाजूला काढले. रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना उपचारासाठी गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. अपघाताची बातमी कळताच गडहिंग्लज पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची व अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दरम्यान, सूरज तिप्पे, विशाल पाटील, सूरज पाटील व संदेश तिप्पे हे चौघेही मोटारीने नेसरी येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते, असे समजते. रात्री नेसरीतून गडहिंग्लजकडे परत येत असताना ही दुर्घटना घडली. सूरज तिप्पे वगळता उर्वरित तिघेही तरुण महागावच्या कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी एकाच वर्गात शिकतात. हे चौघेही गडहिंग्लजमध्येच मुक्कामाला असतात. 

पंधरवड्यात तीन अपघात
गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर गेल्या पंधरवड्यात तीन भीषण अपघात झाले. १३ एप्रिल या एकाच दिवशी महागाव व हरळीजवळ झालेल्या दोन अपघातांत आठ जण ठार झाले. त्यानंतर आज झालेल्या भीषण अपघातात तिघे जण ठार झाले. यामुळे गेल्या पंधरवड्यात अकरा जण ठार झाले. नवीन रस्ता झाल्यापासून हे तीन सर्वांत मोठे अपघात झाल्याची चर्चा सुरू होती. 

संकटमोचक हरळीकर 
१३ एप्रिल रोजी हरळीजवळच झालेल्या अपघातावेळी स्थानिक ग्रामस्थांनी संकटमोचक म्हणून काम करत जखमींना वेळेत उपचारासाठी दाखल केले होते. आजच्या अपघातातही रस्त्याकडील रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन चक्काचूर मोटारीत अडकलेल्या जखमींना वेळेत बाहेर काढून दवाखान्यात पाठविण्याचे काम केले. हरळी ग्रामस्थांनी दाखवलेल्या माणुसकीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

तिप्पे कुटुंबांवर आघात
सेनापती कापशी - तमनाकवाडा येथील सूरज जयवंत तिप्पे (वय २४) याने दोन वर्षांपूर्वी महागाव येथील एका महाविद्यालयातून बीई सिव्हिल केले आहे. नंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेसाठी क्‍लास करून आता तो गडहिंग्लज येथे अभ्यास करत होता. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो बाहेर गेला होता.

त्याच्यासोबत याच गावचा याच महाविद्यालयात शिकणारा संदेश सदाशिव तिप्पे (वय २२) होता. तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील असून चार महिन्यांपूर्वीच संदेशची नोकरीसाठी कॅम्पसमधून निवड झाली आहे. त्याला वडील सदाशिव यांनी अत्यंत कष्टात, गरिबीत राहून शिक्षण दिले आहे. या अपघाताने दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.

कंटेनरमधील स्पर्धा...
चंदगड तालुक्‍यातील एका कारखान्यातून मोलॅसिस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. गडहिंग्लजमार्गे ते मुंबईकडे निघाले होते. चंदगड-गडहिंग्लज या नव्यानेच झालेल्या रस्त्यावरून या कंटेनरची जणू धावगतीची स्पर्धाच लागल्याचे चित्र होते. हरळीजवळ आल्यानंतर पहिल्या क्रमांकावर असलेल्या भरधाव कंटेनरने मोटारीला उडवले. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. कंटेनरच्या जखमी चालकाला यावेळी मारहाण झाली. हे पाहूनच मागे असलेल्या दोन कंटेनरचे चालक तेथेच कंटेनर लावून पळून गेल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com