धोम कालव्यात बुडून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

वाई - धोम धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या वाई तालुक्‍यातील तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला. बावधन, शेंदूरजणे व खानापूर येथे या घटना घडल्या. तिघांचेही मृतदेह मिळाले आहेत.

वाई - धोम धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या वाई तालुक्‍यातील तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला. बावधन, शेंदूरजणे व खानापूर येथे या घटना घडल्या. तिघांचेही मृतदेह मिळाले आहेत.

यश सुभाष दाभाडे (वय 13, रा. बावधन), रंगनाथ शामराव सळमाके (वय 20, मूळ रा. आमगाव- भंडारा, हल्ली रा. शेंदूरजणे) व रमेश विनायक जाधव (वय 28, रा. खानापूर) अशी मृतांची नावे आहेत. यश हा काल (ता. 21) सकाळी नऊ वाजता सुतारी नावच्या शिवारात धोम उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. बराच काळ तो घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेताना कालव्यालगत त्याचे कपडे मिळाले; परंतु रात्रभर त्याचा शोध लागला नाही. आज सकाळी सातच्या सुमारास बावधनच्या हद्दीतील मायनरच्या (नं. 4) दारीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. चांगले पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला असल्याची माहिती अमोल दाभाडे याने पोलिसांत दिली.

दुसऱ्या घटनेत रमेश हा काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडीच्या हद्दीत असलेल्या धोम डावा कालव्यात पोहण्यासाठी घरातून निघून गेला. तो परत आला नाही. त्याचे कपडे, मोबाईल व चप्पल कालव्याजवळ आढळले. आज सकाळी त्याचा मृतदेह पांडे गावच्या हद्दीत सापडला. याबाबत आनंदा जाधव याने माहिती दिली. शेंदूरजणेतील रंगदास हा आज सकाळी साडेआठ वाजता मित्रांसमवेत कवठे- केंजळ उपसा सिंचन योजनेजवळ धोम डावा कालव्यात पोहण्यासाठी गेला. मात्र, पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पाचच्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यात सापडला. याबाबत अविनाश जुगनावे यांनी माहिती दिली आहे.

Web Title: three drown in dhom canel