निपाणी : यमगर्णी येथील तलावात पकडली तीन फुटी मगर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

निपाणी - यमगर्णी  येथील सार्वजनिक तलावामध्ये नागरिकांना मगर आढळून आली होती. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. आज (ता. 29) वन विभागाचे कर्मचारी प्रभाकर गोकाक, भरत पाटील व सहकाऱ्यांनी ही तीन फुटी मगर पकडली. वेदगंगा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यातून गटारीमार्गे मगर आल्याचा अंदाज आहे. वन कर्मचाऱ्यांनी मगरीला हिडकल जलाशयात सोडून दिले. 

गावामध्ये हा एकमेव तलाव असल्याने त्यातील पाण्याचा वापर महिला कपडे धुण्यासाठी व इतर वापरासाठी करतात. मात्र मगर दिसल्यापासून महिला तलावाकडे येण्यास घाबरत होत्या. परिणामी ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवत होती. आठ दिवसांपूर्वी काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांना मगरीचे दर्शन झाले होते. याची माहिती महिलांनी ग्रामपंचायतीस दिली. ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेत वन विभागास ही माहिती कळविली.

ग्रामपंचायतीमार्फत तलावातील पाण्याचा आठ दिवस उपसा करण्यात येत होता. तसेच दोन कामगारांना देखरेख करण्यासाठी नेमले होते. पाणी कमी होताच मगर दिसून आली. मगर पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. मात्र तलावामध्ये गाळ भरपूर प्रमाणात असल्यामुळे मगर पकडण्यास अडचण येत होती. त्यासाठी जेसीबीचे सहाय्य घेण्यात आले. प्रभाकर गोकाक यांनी चपळाईने मगर पकडल्यावर गावकऱ्यांनी निःश्वास सोडला. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष नासीरखान इनामदार, ग्रामपंचायत सदस्य अभिजित पोवार, ग्रामविकास अधिकारी रवी कऱ्याप्पन्नवर, भीमा पिसोत्रे, आनंदा पोवार, ग्रामपंचायत कर्मचारी फय्याज जमादार, महादेव कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three feet long Crocodile found in Yamgarni pond