मटणात सुद्धा म्हणे एक, दोन, तीन ग्रेड...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

बावड्याच्या परिसरातील गावांमध्ये मटणाचा दर आणि बावड्यात विकल्या जाणाऱ्या मटणाचा तर यामध्ये दीडशे रुपयांचा फरक आहे. बावड्यातील मटण विक्रेते मनमानी दर लावून ग्राहकांची लूट करत आहेत.

कोल्हापूर - मटण दरवाढ विरोधात बावडेकरांनी व्यापक बैठक बोलावली होती. या बैठकीत मटण विक्रेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. ग्रामस्थांनी दिलेला प्रस्ताव मान्य न करता मटण विक्रेते बैठकीतून निघून गेले. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

भारत वीर मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मटण दरवाढ विरोधात नागरिकांनी मते मांडली. बावड्याच्या परिसरातील गावांमध्ये मटणाचा दर आणि बावड्यात विकल्या जाणाऱ्या मटणाचा तर यामध्ये दीडशे रुपयांचा फरक आहे. बावड्यातील मटण विक्रेते मनमानी दर लावून ग्राहकांची लूट करत आहेत. जाधववाडी, कदमवाडी, उचगाव, वडणगे, निगवे, चिखली या परिसरात जर दर कमी असेल तर बावड्यात जास्त का? असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला. तसेच बावड्यात बाहेरील व्यक्तीला दुकान घालू दिले जात नाही. केवळ दोनच कुटुंबे बावड्यात दुकान चालवतात. त्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे, असाही आरोप नागरिकांनी केला. 

हे ही पाहा - शंभरी पार लक्ष्मीबाईंच्या हस्ते सांगलीत पुलाचा वाढदिवस 

आम्ही दर कमी करणार नाही, मटण विक्रेत्यांची भूमिका

यावर मटण विक्रेत्यांच्या समितीला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. यावेळी मटण विक्रेत्यांनी शहरात ज्या दराने मटण विक्री केली जाते, त्याच दराने आम्ही मटण विक्री करणार, असे सांगितले. याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. "आम्हाला बकरी महागात मिळतात. बकरी कमी झाली आहेत. त्यामुळे आम्ही दर कमी करणार नाही,' अशी भूमिका मटण विक्रेत्यांनी घेतली. यावेळी सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विक्रेत्यांनी, "आम्हाला आठ दिवस द्या. आम्ही चर्चा करून सांगतो', असे सांगितले; पण ग्रामस्थांनी त्यांना आठ दिवस दुकाने बंद करा, असे सांगितले. त्यानंतर विक्रेत्यांनी सभेतून न सांगताच काढता पाय घेतला. यावर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मटण विक्रेत्यांनी जर आडमुठे धोरण स्वीकारले तर हा लढा तीव्र करून बावड्यातील मटण विक्रीची दुकाने बंद पाडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी अपेक्षा अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

हे ही पाहा - कोल्हापूर सांगली मार्गावर अपघातात तीन युवक ठार 

ग्रामस्थांच्या मागण्या 
- बावड्याच्या आसपासच्या परिसरात स्वस्त मटण मिळत असेल तर तुमची मनमानी का? 
- महापालिकेला किती कर भरता? किती गाळे अडवून ठेवलेत? 
- मटणात सुद्धा एक, दोन आणि तीन नंबर प्रकार कसा काय असतो? 
- आम्हालाही तीन नंबरचे मटण विका. ते कोणत्या प्रकारचे आहे ते कळेल. 
- बावड्यात दर वाढला की शहरात वाढतो. 

विक्रेत्यांचे मत 
- आम्हाला परवडत नाही. 
- आम्ही महापालिकेला कर भरतो. 
- ग्रामीण भागात तीन नंबरचे मटण विकले जाते. 
- आम्ही दर कमी करणार नाही. 

हे ही पाहा -  जेवणासाठी थांबले, अन् हा घडला अनर्थ...

...तर ग्रेड तीनचे मटण द्या 
आजूबाजूच्या ग्रामीण भागातील मटणाचे दर आणि शहरातील दर यांच्यात 100 ते 200 रुपये फरक का? असा प्रश्न ग्रामस्थांनी मटण विक्रेत्यांना केला. त्यावर दुकानदारांनी ग्रामीण भागातील मटण हे ग्रेड तीनचे असल्यामुळे 280 रुपयांत विकले जाते, असे सांगितले. यावर बावड्यातील ग्रामस्थांनी आम्हाला एक महिना हे ग्रेड तीनचे मटण 280 रुपयांत द्या म्हटल्यावर दुकानदार निरुत्तर झाले. काही वेळात त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. याबद्दल ग्रामस्थांनी दुकानदारांचा निषेध केला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Grade Mutton In Kolhapur