माणगंगेत वाहून गेलेल्या तिघांना वाचविण्यात यश; एकजण बेपत्ता

रुपेश कदम
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

माण तालुक्यातील पळशी या ठिकाणी माणगंगा नदीत पोहताना चारजण वाहून गेले. त्यापैकी तिघेजण सापडले असून, यातील तुकाराम यादव खाडे हे वाहून गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. 

दहिवडी : माण तालुक्यातील पळशी या ठिकाणी माणगंगा नदीत पोहताना चारजण वाहून गेले. त्यापैकी तिघेजण सापडले असून, यातील तुकाराम यादव खाडे हे वाहून गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. 

पळशी (ता. माण) येथील तुकाराम खाडे (शेतकरी ), निवास साबळे (पोलिस), भीमराव नाकाडे (आरोग्य विभाग) व संपत खाडे (इंजिनिअर) हे चार वर्ग मित्र  दीपावलीच्या सुट्टी निमित्ताने एकत्र आले होते. आज सायंकाळी 5 वाजता हे सर्व एकत्र आले व त्यांनी माणगंगा नदीवर असलेल्या पाटील वस्ती बंधाऱ्यात पोहण्याचा बेत आखला. सायंकाळी त्यांनी पोहण्यासाठी बंधाऱ्यात उड्या मारल्या. मात्र, पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यावर वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे त्यांना पोहणं कठीण जावू लागलं.

बंधाऱ्यातून पडणाऱ्या पाण्याच्या भोवऱ्यात चारही जण सापडले अन् बुडू लागले. यामध्ये तुकाराम खाडे हा वाहून जाऊ लागले. बाकी तिघे एकमेकांना आधार देत भिंतीच्या कडेला आले. ग्रामस्थांनी त्यांना दोराच्या साहाय्याने व शिडीने वर काढले. त्यानंतर या तिघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुकाराम खाडे याचा शोध घेण्यासाठी नाकाडे वस्तीवरील मुलांनी हॅलोजन लाईट लावून शोध मोहीम सुरु ठेवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. आपत्कालीन पथकास पाचारण करण्यात आले असून, ते सकाळी येणार असल्याचे घटनास्थळावरून समजले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Peoples rescued from Water