अचानक धावलेल्या मोटारीची चाैघांना धडक, तीन जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

  • इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवरील भाग्यरेखा चित्रमंदिराजवळ मोटारीची चार जणांना जोराची धडक
  • या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी
  • मधुकर जोतीराम जगताप, योगिता अरविंद शिंदे, कुलगोंडा शिवगोंडा पाटील व राहुल रामचंद्र बावडेकर अशी जखमींची नावे 

इचलकरंजी - येथील कोल्हापूर रोडवरील भाग्यरेखा चित्रमंदिराजवळ अचानक धावलेल्या मोटारीची चार जणांना जोराची धडक बसली.  त्यांनतर मोटार मुख्य रस्त्यापासून सुमारे 200 ते 300 फुट आत जावून भिंतीवर आदळली. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. मधुकर जोतीराम जगताप, योगिता अरविंद शिंदे, कुलगोंडा शिवगोंडा पाटील व राहुल रामचंद्र बावडेकर अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी दीडच्या सुमारास येथील भाग्यरेखा चित्रमंदिरासमोर मोटार उभी करून गाडीचा चालक दिलीप इंगळे माल देण्यासाठी लगतच्या बेकरीमध्ये गेला होता. याचवेळी गाडीमध्ये असलेल्या सत्यनारायण नथमल मोदानी या युवकाने टेप लावण्यासाठी चावी फिरवली. यावेळी गाडी सुरू झाली व अचानक भरधाव वेगाने रस्त्यावर धावू लागली. घाबरलेल्या संबंधीत युवकाने स्टेअरिंग वळवताच मोटार भाग्यरेखा टॉकीजलगत असलेल्या बोळामध्ये गेली. तेथे उभ्या असणाऱ्या तीन दुचांकींना या मोटारीने धडक दिली व भिंतीवर जाऊन आदळली.

यामध्ये एका युवतीसह चार जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भाग्यरेखा टॉकीजजवळ प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अन्य दोघेजण सुदैवाने बचावले. मात्र त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

मधुकर हे भाग्यरेखा चित्रमंदिरमध्ये कामास जात होते, तर योगिता या मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात होत्या. कुलगोंडा पाटील हे गावी जाण्यासाठी चालत घरातून बाहेर पडले होते. हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत तर राहुल हा किरकोळ जखमी झाला आहे. दुधाच्या कॅनसह गाडी लावून औषध दुकानात गेलेले मोहन परशराम माळी हे सुदैवाने बचावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three seriously injured in an accident in Ichalkaraji