भक्त निवासाचा लाभ घेतला तीन हजार भाविकांनी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

भक्त निवासात राहणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने 24 तास पाण्याची आणि लाइटची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या भक्तांना दोन वेळेच्या जेवणाची सोय देखील करण्यात आली होती. 

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेत सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील भक्त निवासाचा जवळपास दोन ते तीन हजार भाविकांनी लाभ घेतला, अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी आज "सकाळ'ला दिली. 

श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेतील तैलाभिषेक, अक्षता सोहळा आणि इतर धार्मिक विधी, गड्डा यात्रा पाहण्यासाठी व सिद्धेश्‍वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील भक्त निवासात पाच दिवसांत दोन ते तीन हजार परगावचे भाविक मुक्कामास होते. आजही काही भाविक मुक्कामास आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कनार्टकातील बंगळुरू, बागलकोट, कलबुर्गी, अनंतपूर यांसह गुजरात येथील भाविकांनी या भक्त निवासाचा लाभ घेतला. भक्त निवासासोबतच समोर असणाऱ्या पटांगणातसुद्धा भाविकांना झोपण्याची सोय करण्यात आली होती. 

भक्त निवासात राहणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने 24 तास पाण्याची आणि लाइटची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या भक्तांना दोन वेळेच्या जेवणाची सोय देखील करण्यात आली होती. 

समितीकडून सर्व सोय
सिद्धेश्‍वर येथील भक्त निवासाचा तीन हजार भाविकांनी लाभ घेतला. मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भक्तांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय मंदिर समितीच्या दासोहमध्ये करण्यात आली होती. 
- चिदानंद वनारोटे, भक्तनिवास प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand devotees took advantage of Bhakt Niwas