थरार... द बर्निंग ट्रक

Thrill ... The burning truck
Thrill ... The burning truck

नगर तालुका : शुक्रवारी सकाळी साडेअकराची वेळ... नगर-पुणे रस्त्यावरील वाहने नेहमीप्रमाणे जोरात धावत होती... अचानक कर्णकर्कश आवाज आला... मालमोटारीला ओव्हरटेक करणारा दुचारीस्वार मागच्या चाकाखाली सापडला.... तो वाचला पण, पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने मोटारीने पेट घेतला. 

तालुक्‍यातील कामरगाव येथे शुक्रवारी दुपारी 11.30 वाजता नगर-पुणे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार प्रवाशांनी पाहिला. डिमॅक कंपनीसमोर ही थरारक घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

घर्षण होऊन ट्रक पेटला 
अधिक माहिती अशी : आज दुपारी नगरवरून पुण्याकडे मालमोटार चालली होती. त्या वेळी एक दुचाकीस्वार तिला ओव्हरटेक करीत होता. मात्र, तो मालमोटारीच्या मागच्या चाकाखाली आला. दुचाकीतील पेट्रोल रस्त्यावर सांडले गेले. त्याचे घर्षण होऊन ट्रकने लगेचच पेट घेतला. 

दुचाकीस्वारासह तिघे जखमी 
या अपघातात दुचाकीस्वार, मालमोटार व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. त्यांना शासकीय रुग्णालयात हलवले. त्या वेळी गावातील शिवा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, संदीप ढवळे, प्रवीण सोनवणे, चैतन्य महापुरे, प्रताप खाडे, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी जखमींना तत्काळ 108 क्रमांकास फोन करून रुग्णवाहिका बोलून घेतले. 

तीन तासानंतर आग आटोक्‍यात 
मालमोटारीत प्रेस छपाईच्या कागदाचे गठ्ठे होते. त्यामुळे वाहनाने तत्काळ पेट घेतला. ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अशोक काळे, शिवाजी कदम, संतोष कोतकर यांनी तीन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्‍यात आणली. 
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी घटनास्थळास भेट दिली. या घटनेमुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळित झाली होती. 

जखमींना रुग्णालयात दाखल केले 
नगर-पुणे रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना साधारण 500 मीटर अंतरावर धुराचे लोळ दिसले. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमखींना बाजूला काढले आणि रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन बंब बोलावून आग विझविली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमींच्या तक्रारीवरून पुढील कारवाई करण्यात येईल. 
- शंकरसिंह रजपूत, सहायक पोलिस निरीक्षक, नगर तालुका पोलिस ठाणे 

आग विझविण्यासाठी मदत 
अपघात घडल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 108 रुग्णवाहिका बोलावून ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन बंब आल्यानंतर आग विझविण्यासाठी त्यांना मदत केली. नगर-पुणे रस्त्यावर काहीही घटना घडली तर, कामरगाव ग्रामस्थ मदतीसाठी धाव घेतात. 
- तुकाराम कोतोरे, सामाजिक कार्यकर्ते 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com