'टिकटॉक'फेम आकाशला हजारो मित्रांनी दिला शेवटचा निरोप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, आंघोळ करून त्याने घरात चहा घेतला. घराबाहेर पडला तो दिवसभर आलाच नाही. रात्री नातेवाईकामधील एका मित्राच्या वाढदिवसाला गेला. दरम्यान, त्याने झोपेच्या गोळ्या व नशा होणारे द्रव्य घेतले...

सोलापूर : सोलापूरचा राईडर नावाने फेमस असलेल्या आकाश अनंत जाधव (वय 27, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच्या अंत्यविधीला दोन ते अडीच हजार मित्रांची गर्दी जमली होती. सोशल मीडीयावर त्याच्या आठवणीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. 

सर्वांशी कायमच हसत संवाद साधणाऱ्या आकाशने अचानक आत्महत्या का केली हे कोणालाच माहिती नाही. टिकटॉकवर फेमस असलेल्या आकाशची लोकप्रियता त्याच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिसून आली. त्याने संगमेश्वर महाविद्यालयात 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. आकाशला बाईक रायडिंगचा छंद होता. फेसबुकवर त्याचे सोलापूरचा राईडर नावानेच अकाऊंट होते. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आकाशने आत्महत्या केली. मानसिक तणावातून रविवारी रात्री आकाशने आत्महत्येसाठी गोळ्या खाल्ल्या. विषही प्राशन केले. शेवटी रेल्वे रुळावर जावून तो झोपला. काही तरुणांनी त्याला पाहून आरडाओरड केली. तरुणांनी हटकल्यानंतर आकाश काही अंतरावर जावून पुन्हा रेल्वे रुळावर झोपला. अखेर त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले. आकाशने आत्महत्या केल्याचे कळताच कुटूंबीयांसह मित्रांना धक्का बसला. आकाश विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. 

कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या कारवर तो ड्रायव्हर म्हणून कामाला होता. कामाव्यतिरिक्त तो स्पोर्टस मोटरसायकल चालवणे, स्टंट करणे असे प्रकार करीत होता. एका चाकावर मोटरसायकल चालवून तो सर्वांना आश्‍चर्यचकित करीत असे, मुंबई, पुणे आदी भागातून येणारे रायडर्स त्याला बोलावून घेत असत, त्यांच्यासमोर तो स्टंट करून दाखवत असे. मोटरसायकलचा स्टंट पाहण्यासाठी लोक गर्दी करीत असत. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टिष्ट्‌वटर, इन्स्टाग्रामवर तो विविध पोझमधील फोटो व डायलॉग शेअर करीत होता. विविध विषयांवर आधारित टिकटॉक कॉमेडी व्हिडिओ तयार करणे हा देखील त्याचा छंद होता. सोशल मीडियावरील त्याची सक्रियता पाहून त्याला मुंबई येथील प्रसिद्ध टिकटॉक ग्रुपने आमंत्रण दिले होते. मुंबई येथे जाऊन विविध विषयावर टिकटॉक व्हिडिओ करीत तिथेच एखादी नोकरी करण्याच्या तयारीत होता. 

रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, आंघोळ करून त्याने घरात चहा घेतला. घराबाहेर पडला तो दिवसभर आलाच नाही. रात्री नातेवाईकामधील एका मित्राच्या वाढदिवसाला गेला. दरम्यान, त्याने झोपेच्या गोळ्या व नशा होणारे द्रव्य घेतले. आकाशने मित्रांना फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. शेवटच्या क्षणी मुलाचा आवाज ऐकण्यासाठी पत्नी कांचनला फोन केला. माझ्या मुलाला उठव त्याचा मला शेवटचा आवाज ऐकायचा आहे असे तो म्हणाला. पत्नीने तुम्ही असे का बोलता असा प्रश्न केला तेव्हा त्याने मुलाच्या कानाला मोबाईल लावण्याचा आग्रह केला. झोपेत असलेल्या मुलाच्या कानात आकाशने काय सांगितले माहीत नाही. रेल्वे रूळावर पडून त्याने जगाचा निरोप घेतला. सोमवारी त्यांच्या अंत्यविधीला शहर व परिसरातील दोन ते अडीच हजार लोक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tik tok fem Akash Jadhav commits suicide