विवेकानंद महाविद्यालयात सेट परीक्षेवेळी गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कोल्हापूर - पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या कालावधीत ऐनवेळी केलेला बदल आणि प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलून देण्यात विलंब झाल्याने विवेकानंद महाविद्यालयामध्ये आज गोंधळ उडाला. सेट परीक्षार्थींना दुपारी जेवणासाठी अवघा 25 मिनिटांचा वेळ मिळाला. धावपळीत परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. 

कोल्हापूर - पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या कालावधीत ऐनवेळी केलेला बदल आणि प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका बदलून देण्यात विलंब झाल्याने विवेकानंद महाविद्यालयामध्ये आज गोंधळ उडाला. सेट परीक्षार्थींना दुपारी जेवणासाठी अवघा 25 मिनिटांचा वेळ मिळाला. धावपळीत परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. 

परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठातर्फे शहरातील पाच वेगवेळ्या महाविद्यालयांतील केंद्रांवर सेट परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे भागातील परीक्षार्थी आले होते. येथील विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर परीक्षेच्या वेळी गोंधळ उडाला. नियोजित वेळेनुसार सकाळी दहा वाजता परीक्षार्थींना प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या. यानंतर काही वेळातच तांत्रिक कारणामुळे प्रश्‍नपत्रिका परत घेण्यात आल्या. काही वेळाने पुन्हा प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या तेव्हा 11 वाजून दहा मिनिटे झाली होती. काही परीक्षार्थींना अगोदर वाटलेल्या उत्तरपत्रिका परत घेतल्यानंतर त्याच बदलून देण्यात आल्या. यामुळे त्या उत्तरपत्रिकेवर पूर्वी लिहिलेल्या आसन क्रमांकाची खाडाखोड करावी लागली. 

दोन पेपरमध्ये दीड तासाची सुटी होती. त्या दीड तासातील बहुतांश वेळ परीक्षेसाठी गेला. त्यामुळे प्रत्यक्ष मधल्या सुटीचा वेळ 25 मिनिटेच उरला. त्यामुळे परीक्षार्थी जेवणासाठी महाविद्यालयाच्या बाहेर आले; पण परिसरात एकच हॉटेल सुरू होते. त्यामुळे एकाच वेळी जास्त संख्येने असलेल्या परीक्षार्थींना पोटभर जेवण मिळणेही मुश्‍कील झाले. साडेचार वाजता दुसरा पेपर संपल्यानंतर बहुतेक परीक्षार्थींनी केंद्रप्रमुख डॉ. व्ही. एस. देसाई यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. 

काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षार्थींचे पेपर परत घ्यावे लागले. यामुळे विलंब झाला. याबाबत पुणे विद्यापीठाशी बोलूनच वेळेत बदल केले आहेत. परीक्षार्थींचा जेवढा वेळ गेला, तेवढा वेळ त्यांना वाढवून दिला. यामुळे सुटीचा वेळ कमी झाला; मात्र परीक्षा प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नसून, परीक्षा नियमानुसारच झाली. 
- डॉ. व्ही. एस. देसाई, केंद्रप्रमुख 

Web Title: At the time of the set examination mess