चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज नगरपंचायतीत आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

चंदगड येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार तर उर्वरित सतरा प्रभागांतून नगरसेवक पदासाठी तब्बल ५९ उमेदवार रिंगणात आहेत.

कोल्हापूर - गडहिंग्लज नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रातील प्रभागाच्या आणि  चंदगड, हातकणंगले नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. २९) मतदान होत आहे. यासाठी प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज असून, सोमवारी (ता.३०) मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.

चंदगडमध्ये बहुरंगी लढतीमुळे मतदारांची कसोटी 

चंदगड येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार तर उर्वरित सतरा प्रभागांतून नगरसेवक पदासाठी तब्बल ५९ उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील ७ हजार ८२५ उमेदवार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात ३ हजार ९८१ पुरुष तर ३ हजार ८५४ स्त्री मतदार आहेत. बहुरंगी लढतीमुळे मतदान करताना मतदारांचीच कसोटी लागणार आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळी प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होईल. 

नगराध्यक्षपदासाठी प्राची काणेकर, समृध्दी काणेकर, शुभांगी चौगुले व वैष्णवी हळदणकर यांच्यात लढत होत आहे. प्रभाग १- प्रदीप कडते, अजय कदम, अभिजित गुरबे. प्रभाग २- दिलीप चंदगडकर, राजीव चंदगडकर, चंद्रकांत दाणी, शंकर देशमुख, जावेद नाईक, खालिद पटेल, जहांगीर पटेल, सुधीर पिळणकर, विक्रम मुतकेकर, चेतन शेरेगार. प्रभाग ३- शहीदा नेसरीकर, फिरदोस मदार, मुमताजबी मदार. प्रभाग ४- नूरजहॉ नाईकवाडी, शगुफ्ता फणीबंद.प्रभाग ५- अब्दुलसत्तार नाईक, मेहताब नाईक, सिकंदर नाईक, सुहेल नाईक, सलाउद्दिन नाईकवाडी, इस्माईल मदार, महमदशफी मुल्ला. प्रभाग ६- नवीद अत्तार, झाकीरहुसेन नाईक, अल्ताफ मदार, इस्माईल शहा. प्रभाग ७- नेत्रदीपा कांबळे, विद्या कांबळे. प्रभाग ८- सचिन पिळणकर, संतोष वणकुंद्रे, आनंद हळदणकर. प्रभाग ९- लक्ष्मी गायकवाड, अनुसया दाणी, अक्षता निट्टूरकर, जयश्री फाटक. प्रभाग १०- अनिता परीट, सोनिया रजपूत, सरीता हळदणकर. प्रभाग ११- सचिन नेसरीकर, गजानन पिळणकर. प्रभाग १२- अब्दुलसत्तार मुल्ला, फिरोज मुल्ला, गफार शेरखान. प्रभाग १३- माधुरी कुंभार, सुचित कुंभार. प्रभाग १४- गोविंद गुरव, विनायक पाटील, रोहीत वाटंगी. प्रभाग १५- संजीवनी चंदगडकर, सुजाता सातवणेकर, उज्वला सुतार. प्रभाग १६- प्रमिला गावडे, संजीवनी देसाई. 
प्रभाग १७- संजना कोकरेकर, माधुरी पवार, सुवर्णा गुळामकर हे उमेदवार नशीब आजमावत आहेत. प्रभागनिहाय सतरा मतदान केंद्रावर मतदान होईल. त्यासाठी अंगणवाडीच्या खोल्या, जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाची इमारत, उर्दू विद्या मंदिर, दि न्यू इंगिल्श स्कूल, कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, रवळनाथ विद्यालयाच्या इमारतीतील खोल्यांमध्ये व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाने तहसीलदार विनोद रणावरे, नायब तहसीलदार डी. एम. नांगरे व सहकारी नियोजन राबवत आहेत.

हेही वाचा - इतिहासप्रेमींचा सवाल; शिवा काशीद समाधिस्थळाची जबाबदारी कोणाची ?

गडहिंग्लज हद्दवाढीतील २ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात 

गडहिंग्लज  येथील नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रातील प्रभागाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.  जनता दल-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीविरुद्ध भाजप-मनसेच्या शहर विकास आघाडीत लढत होत आहे. चार ठिकाणच्या सहा मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल.
पालिका हद्दवाढ क्षेत्रातील निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जाहीर प्रचार शुक्रवारीच थांबला असला तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत गुप्त प्रचार सुरू आहे. अंतर्गत जोडण्या लावण्यासह काठावरील मतदारांना आपलेसे करण्यासाठी विश्‍वासू शिलेदारांची यंत्रणा कार्यरत होती. दोन्ही आघाड्यांकडून विजयासाठी जोर लावला जात असल्याचे दिसून येत आहे. जनता दल-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीकडून महेश कोरी व शुभदा पाटील, तर भाजप-मनसे आघाडीकडून नागेश चौगुले व क्रांती पोटे रिंगणात आहेत. संदीप रोटे यांची उमेदवारी असली तरी त्यांनी जनता दल आघाडीला पाठिंबा दिला आहे. 
क्रिएटिव्ह हायस्कूल, झाकीर हुसेन विद्यालय, एम. आर. हायस्कूल व डॉ. घाळी महाविद्यालयातील एकूण सहा मतदान केंद्रांवर सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरवात होईल. ३ हजार ९७६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये एक हजार ९५६ महिला मतदारांचा समावेश आहे. सोमवारी (ता.३०) गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा - मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् 

हातकणंगलेत नगराध्यक्षपदासाठी पाच जण रिंगणात

हातकणंगले येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी ९ हजार ८२७ मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत. नगराध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर १७ नगरसेवक पदासाठी एकूण ८१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात, हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. हातकणंगले नगरपंचायतीसाठी एकूण १७ मतदान केंद्र उभारली असून, प्रत्येक केंद्रासाठी एक झोनल अधिकाऱ्यांसह पाच शिपाई आणि एक पोलिस कर्मचारी तैनात केला आहे. मतदान केंद्रावर एकूणच १२५ कर्मचारी असणार आहेत. त्यापैकी झोनल अधिकारी ६ असणार आहेत. केंद्रावर आणि केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी ३० पोलिस कर्मचारी तैनात केले असून, त्यापैकी ३ पोलिस अधिकारी असणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Voting In Chandgad Hatkanangale Gadhinglaj Narpanchayat Kolhapur Marathi News