राष्ट्रवादीच्या यादीवर आज निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीवर उद्या (बुधवारी) मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या येथील कॉंग्रेस भवनात कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. भाजपने आज सातारा, जावळी मतदारसंघ व माण तालुक्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या असून, भाजपची जिल्हा परिषदेसाठी आरक्षित जागांची पहिली यादी 29 जानेवारीला प्रसिद्ध केली जाण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवर भर दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वात प्रथम इच्छुकांच्या मुलाखती घेऊन यादी प्रदेश कार्यालयास अंतिम करण्यासाठी पाठविली होती. या यादीवर उद्या (बुधवारी) मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीत निर्णय होईल. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. बहुतांशी प्रत्येक गट, गणातून दोन उमेदवार निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे. साधारण पाच फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादीची अंतिम यादी जाहीर होईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
कॉंग्रेसमधून इच्छुकांच्या मुलाखती उद्या (बुधवारी) येथील कॉंग्रेस भवनात होणार आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश पक्ष निरीक्षक अजय छाजेड, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील व कार्याध्यक्ष विजयराव कणसे उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसला अद्याप सर्व जागांवर इच्छुक उमेदवार मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षाने तालुकास्तरावरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. आज जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व जावळी मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या वेळी तालुकाध्यक्ष अभय पवार, दत्ताजी साळुंखे, विकास देशपांडे, किसन बलशेटवार हे पदाधिकारी उपस्थित होते, तसेच माण मतदारसंघातील मुलाखती डॉ. दिलीप येळगावकर यांनी घेतल्या. उद्या (ता. 24) कऱ्हाड उत्तरमधील मुलाखती उंब्रजला होतील. शनिवारी (ता. 28) कऱ्हाड दक्षिणमधील मुलाखती पूर्ण होतील. यानंतर 29 जानेवारीला भाजपची 50 टक्के उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होईल. ही यादी आरक्षित जागांची असेल, असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले.

Web Title: Today's decision on the list of NCP