Ulhas Devlekar
Ulhas Devlekarsakal

Sangli News : ‘सकाळ’चे छायचित्रकार उल्हास देवळेकर यांचे निधन

दैनिक सकाळचे येथील छायाचित्रकार उल्हास नारायण देवळेकर (वय ५७) यांचे मंगळवारी (ता. १५) आकस्मिक निधन झाले.

सांगली - दैनिक सकाळचे येथील छायाचित्रकार उल्हास नारायण देवळेकर (वय ५७) यांचे मंगळवारी (ता. १५) आकस्मिक निधन झाले. गेल्या ३८ वर्षापासून ‘सकाळ’साठी काम करताना त्यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘पीटीआय’सह विविध आंतराष्ट्रीय वृत्तसंस्थांसोबत काम केले.

त्यांच्या पश्‍चात ज्येष्ठ बंधू व प्रसिध्द छायाचित्रकार उदय देवळेकर यांच्यासह पत्नी संगीता, मुलगा नीरज, भावजय, विवाहित बहिणी, पुतणे, चुलत बंधूंसह मोठा परिवार आहे. आज सकाळी अमरधाम स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार झाले. उद्या (ता.१७) सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन आहे.

छायाचित्रकार म्हणून देवळेकरांची ओळख सांगलीला गेल्या ६०- ६५ वर्षापासूनची. सुमारे साठ वर्षापुर्वी पुणे ‘सकाळ’साठी उल्हास यांचे वडिल नारायण यांनी काम सुरु केले. तो वारसा त्यांचे बंधू दिवंगत छायाचित्रकार चंद्रशेखर देवळेकर आणि मुले उदय आणि उल्हास यांनी सांभाळला. उल्हास यांनी बंधू उदय यांच्या बरोबरीने शाळकरी वयातच हाती कॅमेरा घेतला. पोरसवद्या वयात ते ‘सकाळ’चे छायाचित्रकार झाले.

छायाचित्रातील कृष्णधवल कालखंडापासून त्यांनी छायाचित्रे टिपली. एसटीने कोल्हापूरला छपाईला पाठवण्यापासून ते आजच्या डिजीटल युगापर्यंत त्यांनी अखंडपणे काम केले. ‘प्रेस फोटोग्राफर’ या शब्दाला ‘देवळेकर’ हे नाव समांतर झाले ते या परिवाराच्या अखंड सेवेमुळेच.

जिल्ह्याच्या गेल्या तीन-साडेतीन दशकातील समाजकारण-राजकारणातील हजारो प्रसंग त्यांनी कॅमेराबध्द केले. चांदोली ते उमदी असा सर्वदूर जिल्हाभर संचार करतांना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जिल्ह्यातील दुष्काळ, महापूर, अवाढव्य सिंचन योजना, लढे-आंदोलने, दीनदुबाळ्यांच्या जगण्याचे प्रश्‍नांना त्यांनी वाचा फोडली.

चार दशकांतील ऐतिहासिक क्षण छायाचित्रणातून चिरंतन केले. बातमीदाराच्या नजरेतून त्यांनी राजकीय सभा, कुस्ती मैदाने आणि दिग्गज कलावंतांच्या मैफली कॅमेराबद्ध केल्या. आपल्यातील चौकस बातमीदार, निसर्गप्रेमी, कलासक्त माणूस कायम जिवंत ठेवला. अगदी सोमवारी सांगली सिव्हिल रुग्णालयाच्या दुरवस्थेची छायाचित्रे ‘सकाळ’कडे रात्री सातच्या सुमारास त्यांनी पाठवली.

त्यानंतर काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रकृती चिंताजनक झाली आणि सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. नेहमीच समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्या उल्हास यांचं असं अकस्मित जाणे सर्वांनाच धक्कादायक होते. अनेकांनी समाजमाध्यमावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावनांना वाट मोकळी करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com