टोल वसुलीसाठी आता नवीन प्रणाली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे प्रत्येक "टोल'नाक्‍यावर "फास्टॅग'ची व्यवस्था करण्यात आली. या लेनमध्ये वाहनांच्या काचेवर "फास्टॅग'चे स्टिकर चिकटविण्यात येणार आहेत. हे स्टिकर "टोल'नाक्‍यावरील स्कॅनरद्वारे स्कॅन केले जाईल. त्या वाहनमालकाच्या बॅंकखात्यातून "टोल'च्या रकमेची वजावट होईल.

नगर ः "टोल'नाक्‍यावर रोख रक्कम देऊन "टोल' भरण्याऐवजी "फास्टॅग' प्रणालीद्वारे "टोल'भरणा करावा लागेल. राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व "टोल'नाक्‍यांवर येत्या एक डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे वाहनांना जास्त वेळ रांगेत थांबण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे,'' अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्र. भा. दिवाण यांनी दिली. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे प्रत्येक "टोल'नाक्‍यावर "फास्टॅग'ची व्यवस्था करण्यात आली. या लेनमध्ये वाहनांच्या काचेवर "फास्टॅग'चे स्टिकर चिकटविण्यात येणार आहेत. हे स्टिकर "टोल'नाक्‍यावरील स्कॅनरद्वारे स्कॅन केले जाईल. त्या वाहनमालकाच्या बॅंकखात्यातून "टोल'च्या रकमेची वजावट होईल. त्यानंतर त्वरित स्वयंचलित बूम बॅरिअर उघडले जाईल आणि वाहन मार्गस्थ होईल. या प्रक्रियेस अत्यंत अल्प वेळ लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी एक डिसेंबरपूर्वी त्यांच्या वाहनांवर "फास्टॅग' स्टिकर लावावेत. 

राष्ट्रीय महामार्गावरील सर्व "टोल'नाक्‍यांवर "फास्टॅग' स्टीकर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुगल प्ले-स्टोअरवर "माय फास्टॅग' नावाचे ऍपदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक डिसेंबरपासून "फास्टॅ'ग प्रणालीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

टोल नाक्‍यावर टोल भरताना नागरिकांचा वेळ, इंधन खर्च होत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत. आता या मनस्तापापासून मुक्ती मिळावी, टोल प्रणाली कॅशलेससाठी फास्टॅग संकल्पना पुढे आली. फास्टॅग हे स्मार्ट कार्डसारखे आहे. मात्र, यासाठी कोणत्याही मशिनीवर हे कार्ड ठेवण्याची गरज नाही. टोल नाक्‍यावरील सेन्सरच कोड टिपून घेईल. त्यामुळे रोख रक्कम किंवा डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर न करता टोल भरता येईल. 

फास्टॅग म्हणजे काय? 
फास्टॅग हा रेडिओ प्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग आहे. हा वाहनाच्या दर्शनी काचेवर लावणे आवश्‍यक आहे. हा टॅग बॅंकेच्या खात्याशी किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पेमेंट वॉलेटशी जोडण्यात येतो. टॅगमुळे टोल नाक्‍यावरून जाताना रोख रकमेतून टोल भरण्याची आवश्‍यकता नाही. वाहनचालकांच्या खात्यातून ही रक्कम वजा होईल. फास्टॅगचा धारकांसाठी स्वतंत्र मार्ग राहील. टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट दंड वसूल करण्याची तरतूद कायद्यातच आहे. 

फास्टॅगसाठी वन टॅग डिपाझिट 
वाहनचालक कोणत्याही सरकारी बॅंकेतून फास्टॅग स्टिकर खरेदी करू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यास घरबसल्या फास्टॅग स्टिकर मिळू शकते. फास्टॅगसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्‍यकता आहे. वन टाइम टॅग डिपॉझिटची रक्कम भरल्यानंतर फास्टॅग मिळवता येईल. कार, जीप आणि व्हॅनसाठी 200 रूपये, ट्रक, ट्रॅक्‍टरसाठी 500 रूपये शुल्क आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll recovery will be "this' system