
मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही भगवा फडकवणार असल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले.
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर, हातात भगवे ध्वज व बेळगाव, कारवार, निपाणीसह, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक गुरुवारी (ता.21) दुपारी महाराष्ट्र-कर्नाटक (शिनोळी) सीमेवर दाखल झाले. सीमेवर कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांची अडवणूक केल्यामुळे पोलिस व शिवसैनिकांत काही वेळ झटापट झाली. याचवेळी शिवसैकांनी ठिय्या आंदोलन करत कर्नाटक सरकारचा निशेध नोंदविला.
वीस दिवसांपासून बेळगाव महापालिकेवर कन्नडीगांनी अनधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकविला आहे. या ध्वजाला कर्नाटक सरकारने पाठिंबा दिला आहे. हा ध्वज हटविण्यासाठी आज (ता.21) म. ए. समितीतर्फे बेळगाव महालिकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने हा मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र, शिवसैनिकांनी माघार घेतली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दुपारी 12 च्या दरम्यान शिनोळीत दाखल झाले.
हेही वाचा - शतकोत्तर प्रवासाचा साक्षीदार पाळणा! दिग्गजांसह शंभरावर बाळांचे बारशे -
शिवसैनिक येते असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीमेवर कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांची अडवणूक केली. मात्र, बेळगावमध्ये भगवा फडकणार यावर शिवसैनिक ठाम आहेत. कोणीही आगेकुच करू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यावर बेळगाव पोलिस आयुक्तांनी जिल्हा प्रवेशबंदी बजावली आहे.
मोर्चा स्थगित असतानाही प्रवेश करण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बेळगावला येणारच हा निर्धार देवणे यांनी केला आहे. याचबरोबर अनेक सीमांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. यावेळी संजय पवार, पभाकर खांडेकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, संतोष मळवीकर, संज्योती मळवीकर, संभाजी पाटील, संभाजी पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - शेती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटावी म्हणून अक्षय शेतात नव-नवे प्रयोग करत आहे