परीक्षेत अव्वल, तरीही प्रवेशापासून वंचित 

परीक्षेत अव्वल, तरीही प्रवेशापासून वंचित 

कोल्हापूर - पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याने शिवाजी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेत तो प्रथम आला. मात्र त्याला शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. कारण ऑनलाईन अर्ज भरताना त्याने अन्य विद्यापीठ पर्याय निवडला होता; पण त्याच्याकडे पदवी प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचेच होते. हा सगळा घोळ झाला तो विद्यापीठ प्रशासनाच्या छोट्या चुकीमुळे. कारण ऑनलाईन अर्जात स्वायत्त महाविद्यालय हा पर्यायच नव्हता. त्यामुळे विद्यार्थी अव्वल येऊनही प्रवेशापासून वंचीत रहावे लागले आहे. 

याचे ज्वलंत उदाहरण नुकतेच पुढे आले. एका विद्यार्थ्याने स्वायत्त महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी घेतली. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याने शिवाजी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. ऑनलाईन अर्जामध्ये स्वायत्त महाविद्यालय (डीम्ड कॉलेज) हा पर्याय नसल्याने त्याने शिवाजी विद्यापीठ पर्याय निवडला. कारण त्याला पदवी प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचेच मिळालेले आहे; पण विद्यापीठाचा पर्याय निवडल्यानंतर द्यावा लागणारा पीआरएन नंबर त्याच्याकडे नव्हता. कारण तो विद्यापीठाचा विद्यार्थी नाही.

अखेर नाईलाजाने त्याला अन्य विद्यापीठ पर्याय निवडावा लागला. त्यानंतर त्याचा अर्ज वैध झाला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षाही त्याने दिली. या परीक्षेत तो प्रथम आला. मात्र प्रवेश घेताना ज्यावेळी कागदपत्रे सादर करण्याची वेळ आली.

त्यावेळी त्याचे पदवीप्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाचे असल्याचे निदर्शनास आले. पण ऑनलाईन अर्जात अन्य विद्यापीठ असा पर्याय निवडला होता. त्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही. त्या विद्यार्थ्याला याबाबतची कल्पना असल्याने त्याने 6 मे 2019 ला याबाबत अर्ज करून विद्यापीठ प्रशासनाला कल्पनाही दिली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. 

शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 12 महाविद्यालयांना विद्यापीठाने स्वायत्त दर्जा दिला आहे. त्यांचा अभ्यासक्रम ठरवणे, परीक्षा घेणे याची त्या महाविद्यालयांना स्वायत्ता आहे. मात्र या विद्यार्थ्यांना पदवी शिवाजी विद्यापीठाची मिळते; पण ते शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पी. आर.एन. क्रमांक नाही. विद्यापीठाची पदवी असल्याने ते अन्य विद्यापीठ हा पर्यायही निवडू शकत नाहीत. अशी अडचण स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची झाली आहे. कारण शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन अर्जामध्ये स्वायत्त महाविद्यालय पर्यायच नाही.

ज्या वेळी विद्यापीठ महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालय असा दर्जा देते. त्या वेळी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या ऑनलाईन अर्जात स्वायत्त महाविद्यालय असा उल्लेख करणे आवश्‍यक होते. पण तो न केल्याने एका विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचीत रहावे लागले. 

स्वायत्त महाविद्यालये असा पर्याय ऑनलाईन अर्जात नसल्याने विद्यार्थ्याला प्रवेश घेता आला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढू. 
- डॉ. डी. टी. शिर्के,
प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com