भक्तीचे शक्तिपीठ असलेले श्रीक्षेत्र नृसिंहवाडी

भक्तीचे शक्तिपीठ असलेले श्रीक्षेत्र नृसिंहवाडी

नृसिंहवाडी - निसर्गसौंदर्याचे वरदहस्त लाभलेले, पर्यटकांना भुरळ घालणारे, तालुक्‍याची दक्षिण काशी म्हणून भौगोलिक नकाशात नावारूपास आलेले धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातील ठिकाण म्हणून नृसिंहवाडी प्रसिद्ध आहे.

शक्तिस्थान, साधना, उपासना व भक्तीचे शक्तिपीठ म्हणजे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी, असा या गावचा लौकिक आहे. औदुंबर वृक्षाखाली निसर्गाच्या कुशीत वसलेले पवित्र श्री दत्त मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे.

कृष्णा व पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव म्हणजे नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार, तर ‘नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार समजला जातो.

दत्त महाराजांनी या ठिकाणी १२ वर्षे अर्थात एक तप तपश्‍चर्या केली आणि आपल्या पादुका स्थापन केल्या. त्यामुळेच या स्थानास महाराजांची तपोभूमी मानली जाते. या ठिकाणी तपश्‍चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात.
दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड दिगंबरा दिगंबराचा नामजप, असा माहोल भारावून टाकतो. 

संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या एक्कावन्न पायऱ्यांच्या घाटावर, मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर वसलेले आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्‍यामसुंदर मनोहर व निर्गुण पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आहे. या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटाघुमटांचा आहे. बादशाहने या मंदिराची बांधणी केली असल्याचा चरित्रात उल्लेख आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही गलिफाच्या रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरू चरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. ‘श्री नरसिंह सरस्वती’ हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा मानला जातो. त्यामुळे येथील भक्तगण संन्याशी लोकांचे पूजन करून त्यांचे आदरातिथ्य करतात. येथील घाट एकनाथ महाराज यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. 

वैशिष्ट्य म्हणजे केवळ त्रिकाळपूजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते. इतरवेळी ही वाद्ये वाजवायची नाहीत, असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे. दत्त जयंती, पौर्णिमेला अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्‍वान आलेच, त्याचप्रमाणेच या ठिकाणीही श्‍वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात.

पहाटे ३ ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्त मंदिरात भक्तीचा जागर सुरू असतो. पहाटे काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा व आरती, पालखी सोहळा, शेजारती हे सर्व धार्मिक कार्यक्रम ब्रह्मवृंद मोठ्या भक्तिभावाने करतात. वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी तर प्रसिद्धच आहे.

राहण्याची सोय
भक्त निवास, यात्री निवासमध्ये असून भाविकांसाठी बारा वाजता मंदिरात महाप्रसादाची सोय आहे.

कसे जाल..?
 एस.टी. मार्ग : मुंबई व पुणे येथून कोल्हापूर अथवा सांगली येथे येण्यासाठी थेट बसगाड्यांची सोय असून मुंबईपासून सुमारे ५००, तर पुण्यापासून सुमारे २४५ किलोमीटर अंतर आहे. कोल्हापूर अथवा सांगलीतून नृसिंहवाडीसाठी बसगाड्यांची सोय आहे. कोल्हापूर- ५५ सांगली-२५
 रेल्वे : राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण मध्य रेल्वे मिरज-कोल्हापूर विभागाच्या जयसिंगपूर स्टेशनपासून १५ किलोमीटरवर. मुंबई, पुणे, बेळगाव येथून कोल्हापूरसाठी रेल्वेगाड्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com