ओ काका.. तुमची बाईक राँग साईडने का आणली? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर : "ओ काका.. तुमची बाईक राँग साईडने का आणली?, सोलापूर स्मार्ट सिटी करण्यासाठी करण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे...' असे सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशालेतील आरएसपीच्या विद्यार्थिनींनी वाहनचालकांना सांगितले. निमित्त होते "सकाळ', नवी पेठ व्यापारी असोसिएशन आणि सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशाला (सहिने) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या वाहतूक जागर उपक्रमाचे. शनिवारी नवी पेठ परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. 

सोलापूर : "ओ काका.. तुमची बाईक राँग साईडने का आणली?, सोलापूर स्मार्ट सिटी करण्यासाठी करण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे...' असे सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशालेतील आरएसपीच्या विद्यार्थिनींनी वाहनचालकांना सांगितले. निमित्त होते "सकाळ', नवी पेठ व्यापारी असोसिएशन आणि सखूबाई हिराचंद नेमचंद प्रशाला (सहिने) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या वाहतूक जागर उपक्रमाचे. शनिवारी नवी पेठ परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. 

पारस इस्टेटसमोरील खुल्या जागेत मुख्य कार्यक्रम झाला. मंचावर महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे, नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, सचिव विजय पुकाळे, सहिने प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय जोशी, "आरएसपी'चे प्रमुख संतोष कोथळीकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

सोलापूर स्मार्ट होण्यासाठी सकाळ नेहमीच प्रयत्न करत आहे. वाहतूक जागर उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट सिटीविषयी प्रबोधन करीत आहोत, असे सकाळचे अभय दिवाणजी यांनी प्रास्ताविकात सांगितले. सचिव श्री. पुकाळे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन बारड यांनी आभार मानले. खिलौना दुकानाचे संचालक असिफ शेख यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी चहापानाची व्यवस्था केली होती. 

सहिने प्रशालेतील "आरएसपी' विभागाच्या विद्यार्थिनींनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने नवी पेठेत परिसरात वाहतूक नियमन केले. सुरक्षित वाहने कसे चालवावीत, वळताना कोणती काळजी घ्यावी, गाडी पार्क करताना कोणत्या गोष्टींची दखल घ्यावी, यासह वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी व्यापारी माणिक गोयल, राजू आहुजा, खुशाल देढीया, सागर झाड आदी उपस्थित होते. 

रस्त्यावर पहिला अधिकार हा चालत जाणाऱ्या नागरिकांचा आहे, दुसरा अधिकार हा सायकल वाल्यांच्या, नंतर दुचाकीचालकांचा आणि मग चारचाकी वाल्यांचा आहे. शहरांमध्ये वाहतूकीची शिस्त खरोखर नाही. सोलापूर स्मार्ट व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या सकाळच्या माध्यमातून वाहतुकीचा जागर घेतल्याने नक्कीच सकारात्मक चित्र निर्माण होईल. 
- अविनाश ढाकणे, 
आयुक्त, सोलापूर महापालिका 

सकाळने वाहतूक प्रबोधनासाठी पुढाकार घेतला. ही स्वागतार्ह बाब आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. कायदा आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी बनवला आहे. आरएसपी विद्यार्थी हुशार आहेत. आता सण-उत्सवाचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांनी फुटपाथावरील अतिक्रमण काढल्यास वाहतुकीला अडथळा होणार नाही. वाहन घेऊन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचा विचार व्यापाऱ्यांनी करावा. 
- वैशाली शिंदे, 
सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक नियंत्रण शाखा 

सकाळसोबत आमच्या शाळेतील आरएसपीच्या विद्यार्थिनींना शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीचा जागर केला. अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे. नवी पेठेतील व्यापाऱ्यांकडून आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले तर शहर स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही. 
- धनंजय जोशी, 
मुख्याध्यापक, सहिने प्रशाला 

सोलापुरातील विविध प्रश्‍नांवर सकाळ नेहमीच सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक जागर उपक्रमामुळे व्यापारी आणि नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची पुन्हा एकदा माहिती झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरएसपीच्या विद्यार्थ्यांसोबत वाहतुकीचा जागर संपूर्ण शहरात करावा. व्यापारी म्हणून आमचे नेहमीच सहकार्य राहील. 
- अशोक मुळीक, 
अध्यक्ष, नवी पेठ व्यापारी असोसिएशन

Web Title: traffic awareness to people by students in solapur