वाहतूक कोंडीने कोळकीकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कोळकी - कोळकी-फलटण हद्दीवर असलेल्या पृथ्वी चौकामध्ये वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

कोळकी - कोळकी-फलटण हद्दीवर असलेल्या पृथ्वी चौकामध्ये वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

पृथ्वी चौकामध्ये पुणे, सातारा, सांगली व फलटण शहरामधील वाहनांची तसेच एसटी बसची ये-जा सुरू असते. फलटण तालुक्‍यात श्रीराम, स्वराज, शरयू व साखरवाडी असे चार साखर कारखाने आहेत. येथील नीरा उजवा कालवा बागायत पट्टयातील आसू, विडणी, बरड, राजुरी, राजळे, सरडे, निंबळक, गोखळी, गुणवरे, मुंजवडी, तसेच सांगवी, सोमंथळी भागामधील ऊस या चारही कारखान्यांसह अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्यालाही जातो. त्या उसाच्या बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्‍टर-ट्रॉली ही वाहने पृथ्वी चौकातूनच जातात. कोळकी गाव फलटण शहराला लागूनच असल्याने तसेच वीज-पाण्याची उत्तम सोय असल्याने या भागामध्ये लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. सध्या कोळकीची लोकसंख्या २० हजारांचा टप्पा ओलांडून गेली आहे.

मोठा निवासी भाग असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना, कामानिमित्त फलटण शहरामध्ये जाणाऱ्या नागरिकांना पृथ्वी चौक ओलांडून जावे लागते. सकाळी साडेसहा ते साडेसात, दुपारी ११ ते एक यावेळेत विद्यार्थ्यांची व सायंकाळी पाच ते साडेआठ कार्यालयांतून सुटलेले लोक, विद्यार्थ्यांची पृथ्वी चौकामध्ये मोठी वर्दळ असते. शिवाय टोल नसल्याने व अंतर जवळ पडत असल्याने पुण्याहून सांगलीकडे जाणारी अवजड वाहने, टॅंकर या चौकामधून कोळकीमार्गे जातात. बारामती, फलटणमधून सातारा, दहिवडी, सांगली, शिखर शिंगणापूर, कोल्हापूरकडे जाणारी वाहनेही याच चौकातून जातात.

त्यामुळे चौकात कोंडी नित्याची झाली आहे. त्याला चौकातील अतिक्रमणही जबाबदार आहे. चौकाच्या चारीही बाजूने छोट्या मोठ्या टपऱ्या, हातगाडी तसेच बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करणारी जीप, व्हॅन, रिक्षाही उभ्या असतात. फलटण नगरपालिका व शहर पोलिस ठाणे यांनी समन्वयाने मार्ग काढून पृथ्वी चौकाचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी फलटण व कोळकीच्या नागरिकांमधून केली जात आहे.

वाहतूक पोलिसांचे तोंडावर बोट!
विशेष म्हणजे कधीतरी चुकून वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी या चौकात उभे असतात. त्यांच्यासमोरच अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. मात्र, त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

Web Title: Traffic Kolaki