आता शाळांमध्ये "ट्रॅफिक भिंत' ! 

आता शाळांमध्ये "ट्रॅफिक भिंत' ! 

सातारा  : जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अपघातांची संख्या कोणत्याही परिस्थितीत कमी करण्याचा चंग रस्ता सुरक्षा समितीने बांधला आहे. त्याचाच भाग म्हणून वाहतूक नियमांबाबत अवेरनेस वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ट्रॅफिक भिंतीचा उप्रकम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक अवेरनेस फिडबॅकची संकल्पनाही राबविली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कोणत्याही एका आजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू अपघातांमुळे होत असतो. त्याचबरोबर अपघातात कायमचे व तात्पुरते अपंगत्व आल्यामुळेही अनेक कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अपघातातील मृत्यू व अपंगत्वाची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्याने तसेच वाहतूक चिन्हांची माहिती नसल्यामुळे किंवा त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे होत असतात. नागरिकांना वाहतूक चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी परीक्षा घेतली जाते. त्याच वेळी बहुतांश जण वाहतूक चिन्हे पाहात असतात. त्यांचे अर्थ समजून घेतात. वाहतुकीचे कोणते महत्त्वाचे नियम आहेत, याची माहिती करून घेतात. परंतु, परीक्षेनंतर अनेकांना या नियमांचा व चिन्हांचा विसर पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष वाहन चालविताना या माहितीचा उपयोग होत नाही. त्यातूनच अपघातांना आमंत्रण दिले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. 
वाहतूक नियम व चिन्हे नागरिकांच्या मनात कायमस्वरूपी बिंबविण्यासाठी "ट्रॅफिक भिंती'ची संकल्पना पुढे आली आहे. त्यामध्ये वाहतूक चिन्हे व नियम रेखाटलेली एक भिंत प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात तयार केली जाणार आहे. ही भिंत शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या दृष्टिक्षेपात येईल अशी असणार आहे. त्यामुळे भावी पिढीबरोबरच सध्याच्या पिढीच्या मनातही वाहतुकीबाबत जागृती बिंबवली जाईल. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत पुढे आलेल्या या मुद्याला शिक्षण विभागाने संमती दर्शविली असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस, शिक्षण विभाग हे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत या ट्रॅफिक भिंतीची निर्मिती करणार आहेत. 
वाहतूक नियम व चिन्हांबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती करण्याबरोबरच एकंदर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ट्रॅफिक अवेरनेस फिडबॅक घेण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यासाठी विविध प्रश्‍न असलेले पॉम्पलेट तयार करून त्याची माहिती विद्यार्थी व नागरिकांकडून घेतली जाणार आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या या सकारात्मक उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्याची आशा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com