मुख्याध्यापकांच्या बदलीने ग्रामस्थ भावुक

हरिभाऊ दिघे 
शनिवार, 23 जून 2018

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील तांगडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बबन पावडे यांच्या बदलीने तांगडीचे ग्रामस्थ भावुक झाले. युवा विकास प्रतिष्ठानतर्फे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.

तळेगाव दिघे (नगर): संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील तांगडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बबन पावडे यांच्या बदलीने तांगडीचे ग्रामस्थ भावुक झाले. युवा विकास प्रतिष्ठानतर्फे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.

सहा वर्ष शाळेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन शाळेला तालुका व जिल्हा पातळीवर पुरस्कार व नावलौकिक प्राप्त करुन दिल्याने पावडे व त्यांची पत्नी सुरेखा या दोघांचा प्रतिष्ठानच्या वतीने मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक पावडे यांनी तांगडी याठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ग्रामस्थांच्या लोक सहभागातून गेल्या सहा वर्षात कायापालट केला. त्यामुळे या शाळेचे नाव तालुका व जिल्हा स्तरावरही चमकले आहे. शाळेच्या आवारात विविध उपक्रमही त्यांनी राबवले आहेत. त्यामुळे ही शाळा पाहण्यासाठी अनेक लोक याठिकाणी येत असतात. त्यांची पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी याठिकाणी बदली झाल्याने युवा विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी, पावडे म्हणाले की, या शाळेला यश व किर्ती प्राप्त झाली ती ग्रामस्थांच्या सहभागाने व योगदानाने झाली आहे. मी फक्त एक निमित्त होतो. सर्वांनी एकत्रित आल्यास अशक्य काहीच नाही हे सिद्ध होते. ग्रामस्थांचे भरभरून प्रेम व साथ मिळाली, हिच ऊर्जा घेऊन काम केले. यावेळी कार्तिक तांगडकर, शांताराम तांगडकर, सरपंच अरुणाताई भुजबळ, उपसरपंच सुरेश कान्होरे, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले, आंबी माळेगाव सोसायटीचे चेअरमन गोकुळ कहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस बाळासाहेब ढोले, संतोष घाटकर, हरिभाऊ गाडेकर, सुरेश गाडेकर, दिपक ढमढेरे, राजू राहाणे, संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास धोत्रे, भाऊसाहेब ढोकरे, बाबुराव कदम, ईस्माईल मुजावद आदी शिक्षकांसह युवा विकास प्रतिष्ठानचे बजरंग तांगडकर, तांगडी, पानसवाडी, आंबीखालसा ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात यावेळी दहावीत, विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तांगडी येथील दीपिका कार्तिक तांगडकर या तरुणीने युपीएससी परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवले. तिचा व अमोल गोडे याची पुणे कारागृह येथील पोलीस कर्मचारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: transfer of the headmasters, the villagers are Emotional