प्रतापसिंह उद्यानाला हात लावाल तर याद राखा...

जयसिंग कुंभार
Saturday, 21 November 2020

उद्याने, शाळा, क्रीडांगणांसह सर्व सार्वजनिक जागांवर कोणत्याच प्रकारचे अन्य उद्योग नकोत, अशी "सकाळ'ची भूमिका आहे. त्याच्याशी सहमती व्यक्त करणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया. 

जुन्या सांगलीच्या मध्यवर्ती असलेले ऑक्‍सिजन पार्क असे वर्णन प्रतापसिंह उद्यानाचे करता येईल. चोहोबाजूंनी व्यापारी पेठा आणि रस्त्यांनी वेढलेली उद्याने कधीकाळी सांगलीची शान होती. तत्कालीन महापौर किशोर जामदार यांच्या कार्यकाळात सन 2003 मध्ये या जागेवर व्यापारी गाळे बांधण्याचा घाट घातला गेला. "सकाळ'ने तेव्हा पुढाकार घेत नागरिकांच्या सहकार्याने हे कारस्थान उधळून लावले. आता पुन्हा एकदा उद्यानातील मध्यवर्ती जागा भाड्याने देऊन तिथे हॉटेल सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. उद्याने, शाळा, क्रीडांगणांसह सर्व सार्वजनिक जागांवर कोणत्याच प्रकारचे अन्य उद्योग नकोत, अशी "सकाळ'ची भूमिका आहे. त्याच्याशी सहमती व्यक्त करणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया. 

प्रयत्न उधळून लावू 
कोरोना टाळेबंदीच्या काळात छुपेपणाने ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. सार्वजिक उद्यानात हॉटेल किंवा अन्य कोणत्याच गोष्टी करणे चुकीचे आहे. आमराईतही असे काही करायचा प्रयत्न आम्ही उधळून लावला. कॉंग्रेस हे कदापि होऊ देणार नाही. आम्ही सभागृहात आणि रस्त्यावरही त्याला विरोध करू. 
- उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस 

शिक्षक, मुलांसह विरोध 
व्यापारी गाळे उठवून उद्यानांवर नांगर फिरविण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता. "सकाळ'ने त्या वेळी जनआंदोलन उभे केले होते. आताही आमचा ठाम विरोध असेल. आमची उद्यानाशेजारी शाळा आहे. या उद्यानात मुले बागडतात. तिथे हॉटेल सुरू झाल्यावर मुलांच्या खेळण्यासह विरंगुळा म्हणून आलेल्या नागरिकांनाही तिथे वावरणे मुश्‍कील होईल. आम्ही शिक्षक, मुलांसह रस्त्यावर येऊन विरोध करू. 
- लता देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या 

हे तर सायलेंट किलर 
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी उद्याने, शाळा, क्रीडांगणे प्रशासनाला कशी दिसतात? आमराईत फूड पार्कचा प्रयत्न चोरीछुपे सुरू होता. प्रशासनातील अधिकारी सायलेंट किलर आहेत. ते अशा भानगडी गुपचूपपणे शिजवत असतात. पटेल चौकातील साने गुरुजी उद्यान खोक्‍यांनी वेढले. आता इथेही तेच होईल. आम्ही विरोध करू. 
- सतीश साखळकर, नागरिक कृती समिती 

आमराई मोडण्याची ही चाचणी 
अधिकारी, नगरसेवक आणि व्यावसायिकांच्या दुष्ट लॉबीचा सार्वजनिक जागांवर डोळा आहे. आमराईत फूड कोर्टच्या माध्यमातून बाजाराची ही कोनशिलाच आहे. एकेक इमारत छुप्या पद्धतीने भाड्याने द्यायचे उद्योग सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांतील काही त्यात सहभागी आहेत. पुढील आठवड्यात आम्ही त्याविरोधात निदर्शने करू. 
- आशिष कोरी, जिल्हा सरचिटणीस, मनसे 

प्रशासनाला भानच नाही 
सांगलीचे युवराज प्रतापसिंह महाराजांच्या स्मृतीनिमित्त हे उद्यान स्मारक उभे केले आहे. ज्येष्ठ, महिला, मुले असे सारेच इथे रमतात. हॉटेलमुळे अनावश्‍यक वर्दळ वाढेल. ज्यांना निवांतपणा हवा आहे, त्यांच्यासाठी ही उद्याने आहेत, याचे भानच प्रशासनाला राहिलेले नाही. आयुक्तांना निवेदन देऊन याविरोधातील आंदोलन सुरू होईल. आमदार सुधीर गाडगीळ यांनी वेळीच लक्ष घालून हे रोखले पाहिजे. 
- शरद फडके, ज्येष्ठ नागरिक संघ 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trap to give lease space in Pratap Singh gardan in Sangali