वृक्षारोपणातील ९२ टक्के रोपे जगली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्हा परिषद मैदानासह सातारा शहरातील विविध कॉलनींमध्ये ‘सकाळ’च्या पुढाकाराने २०१६ मध्ये ‘हरित सातारा’ उपक्रम राबविण्यात आला. लोकसहभाग लाभलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १५० पैकी १३८ झाडे डोलत आहेत. वृक्ष जगण्याचे प्रमाणे ९२ टक्के आहे. लोकाश्रय मिळाला तर काय होऊ शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. 

सातारा - जिल्हा परिषद मैदानासह सातारा शहरातील विविध कॉलनींमध्ये ‘सकाळ’च्या पुढाकाराने २०१६ मध्ये ‘हरित सातारा’ उपक्रम राबविण्यात आला. लोकसहभाग लाभलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १५० पैकी १३८ झाडे डोलत आहेत. वृक्ष जगण्याचे प्रमाणे ९२ टक्के आहे. लोकाश्रय मिळाला तर काय होऊ शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. 

नागरिकांनी श्रमदानातून खड्डे काढून घ्यावेत, त्यामध्ये सुयोग्य रोप ‘सकाळ’ उपलब्ध करून देईल, अशी संकल्पना होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. स्पंदन फाउंडेशनने जिल्हा परिषद मैदानावर ९० झाडे लावली. मधल्या काळात काही गेली. परंतु, कार्यकर्त्यांनी पुन्हा त्या जागेवर नवी रोपे लावली. या झाडांना उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घालणे, वेळोवेळी खत घालणे आदी कामे केली. आज ही झाडे चार फुटांवर गेली आहेत. गोडोलीतील झुंजार व यशवंत कॉलनी, समर्थ मंदिर येथील धस कॉलनी, संभाजीनगरातील यशवंत कॉलनी, तसेच जिल्हा परिषद मैदान या ठिकाणीही वृक्षारोपण झाले. गोडोलीतील झुंजार कॉलनीतील महिलांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला. श्रमदानातून खड्डे काढले. त्यात एकूण २७ झाडे लावली. त्यापैकी २३ झाडे जगली आहेत. 

कल्याणी हायस्कूलसमोरील गोडोली उद्यानानजीक यशवंत कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण व संगोपनासाठी पुढाकार घेतला. या ठिकाणी १२ झाडे लावली गेली. त्यापैकी काही मृत झाली. परंतु, रहिवाशांनी मृत झाडांच्या जागेवर नव्याने रोपे लावून ती जगवली. संभाजीनगरातील यशवंत कॉलनीत उंबर, ताम्हण, बहावा आदी प्रजातीची सात झाडे लावण्यात आली. त्यापैकी चार झाडे जगलीत. समर्थ मंदिरजवळ धस कॉलनीतील रहिवाशांनी १५ झाडे लावली. शुभंकर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ही झाडे दत्तक घेतली आहेत. लावलेल्या झाडांपैकी १३ झाडे जगून साधारण पाच फुटांपर्यंत त्यांची उंची गेली आहे. ॲवॉर्ड संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांच्या पुढाकाराने ही झाडे लावली गेली. स्थानिक रहिवासी, जिगिशा बचत गट, सह्याद्री मित्र समूहाचे त्यांना सहकार्य लाभत आहे. या उपक्रमात एकूण १५० पैकी १३८ झाडे जगली आहेत.

‘सकाळ’चा उपक्रम चांगलाच यशस्वी
पावसाळा आला की सारेच झाडे लावतात. शहरालगतच्या टेकड्या हरित करण्याचा संकल्प सोडला जातो. लोक अशा उपक्रमात हिरीरीने सहभागी होतात. नंतर मात्र सोडलेल्या संकल्पाप्रमाणे लावलेल्या झाडांकडेही दुर्लक्ष होते. पुढील पावसाळ्यातच मग रोप लावण्याची आठवण येते. हा अनुभव लक्षात घेऊन श्रमदानाची तयारी असणाऱ्या नागरिकांना आपले घर तसेच कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘सकाळ’ने ‘हरित सातारा’ हा उपक्रम राबविला. तो चांगलाच यशस्वी ठरला.

Web Title: tree plantation green satara