कापूसखेड हल्ला प्रकरणातील संशयितांना फाशीच झाली पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

इस्लामपूर - मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या कापूसखेड (ता. वाळवा) येथील सुनीता रामचंद्र चव्हाण (वय 40) या महिलेवर सपासप वार करणाऱ्या " त्या ' गावगुंडांना फाशीची शिक्षा व्हावी, याबरोबरच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी कापूसखेड प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात जात पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याशी कापूसखेड प्रकरणावर चर्चा केली. 

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, ""एका महिलेवर सपासप वार होतात, 370 टाके पडतात, तरीही इस्लामपूर पोलिस दोन दिवस साधी दखल घेत नाहीत, ही खेदाची बाब आहे. पोलिस उपाधीक्षक महिला आहेत. तहसीलदार महिला आहेत. तरीही महिलांबाबत पोलिस निष्क्रीय का? मसुचीवाडी प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या इस्लामपूर पोलिसांनी दामिनी पथक व अन्य उपाय योजले. मात्र काही दिवसांतच मरगळ आली. पोलिसांना नक्की महिलांच्या संरक्षणासाठी काम करायचे आहे की नाही? हे शोधावे लागेल. वाळवा तालुका क्रांतीचा, चळवळीचा आहे. या तालुक्‍यातून सदाभाऊ खोत चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते मंत्री झाले. तरीही असे चालते हे विशेष. पोलिसांचा गावगुंडांवर वचक नाही. महिला असुरक्षित नाहीत, हेच दिसते.'' 

त्या म्हणाल्या, ""कापूसखेड प्रकरणातील दोषींना कडक शासन व्हावे यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. सरकार निष्क्रीय आहे, दुसऱ्यालाही काही करू देत नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचार, अन्याय वाढत आहेत. आरोपींना फाशी झाल्याशिवाय लोकांची मानसिकता बदलणार नाही. अजुनही पोलिसांनी कापूसखेडमधील जखमी महिलेला पोलिसांनी संरक्षण पुरवावे.'' 

चौघांना अटक, त्यात एक अल्पवयीन 
हा प्रकार शुक्रवारी 30 डिसेंबरला रात्री आठ वाजता घडला. त्यानंतर खडबडून जागे होत दोन दिवसांनी रविवारी रात्री उशिरा इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल सदाशिव कोळी (वय 22), सुशांत ऊर्फ चंक्‍या रघुनाथ साळुंखे (24), संदीप ऊर्फ बाबू दिलीप सुपने (18) व एक अल्पवयीन अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. उद्या (ता.3) मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर केले जाईल. 

Web Title: trupti desai press conference