तुषार पवारांची ‘माउंट एलब्रुस’वर चढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

साताऱ्यातील तुषार पवारांसह महाराष्ट्रातील चार जणांनी युरोपमधील सर्वोच्च शिखर ‘माउंट एलब्रुस’वर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकविला.

कोरेगाव तालुक्‍यातील नांदवळचे सुपुत्र व नवी मुंबई पोलिस दलात तुषार पवार हे काम करतात. त्यांच्यासह चौघांनी १५ ऑगस्ट रोजीच हे शिखर सर केले.

सातारा - साताऱ्यातील तुषार पवारांसह महाराष्ट्रातील चार जणांनी युरोपमधील सर्वोच्च शिखर ‘माउंट एलब्रुस’वर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकविला.

कोरेगाव तालुक्‍यातील नांदवळचे सुपुत्र व नवी मुंबई पोलिस दलात तुषार पवार हे काम करतात. त्यांच्यासह चौघांनी १५ ऑगस्ट रोजीच हे शिखर सर केले.

विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनी युरोपातील हे सर्वोच्च शिखर सर करणारे तुषार हे महाराष्ट्रातील पहिले पोलिस आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक भगवा, रायगडावरील माती, शिवप्रतिमेसह भगवा, तिरंगा व महाराष्ट्र पोलिस ध्वज फडकावून सर्वांनी सर्वोच्च शिखरावर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

‘माउंट एलब्रुस’ हा युरोप खंडातील सर्वांत उंच पर्वत आहे. या शिखराची उंची १८ हजार ५१० फूट असून, काळा समुद्र व कॅरेबियन समुद्राच्या मध्यभागी हे शिखर आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला आहे. या मोहिमेत गिर्यारोहक सागर नलावडे, तुषार पवार, भूषण वेताळ व दहावर्षीय साई कवडे हे सहभागी झाले होते. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

तुषार पवार यांनी पोलिस दलाच्या वर्दीतच १५ ऑगस्टला या शिखरावर यशस्वी चढाई केली. असाच पराक्रम त्यांनी २६ जानेवारी रोजी अफ्रिकेतील सर्वोच्च शिखर असलेले ‘किली मांजारो’ हे शिखर सर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tushar Pawar mount elbrus Success