पोलिसाच्या शरीरात एकवीस तास गोळी 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- राहाता ग्रामीण रुग्णालयाचा कारभार 
- शस्त्रक्रियेची सुविधा, डॉक्‍टरही नाही 
- प्रथमोपचारासाठीच लागले तीन तास 
- नगर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया 

राहाता :  सोनसाखळीचोरांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे यांना काल (बुधवारी) उपचारासाठी मोठ्या दिव्यातून पार पडावे लागले. 

पठारे यांच्या शरीरात शिरलेली गोळी बाहेर काढण्यासाठीची कुठलीही सुविधा व डॉक्‍टरही येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाहीत. केवळ प्रथमोपचार करण्यासाठीही तब्बल तीन तास वेळ गेला. तोपर्यंत त्यांच्या शरीरात गोळी आहे की नाही, याचे निदानही होऊ शकत नव्हते.

तीन तासांनंतर स्कॅन करण्यासाठी त्यांना शिर्डीच्या साईसंस्थानाच्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्कॅन केल्यानंतर त्यांच्या खांद्याजवळ गोळी शिरल्याचे निष्पन्न झाले; मग त्यांना शस्त्रक्रियेसाठी नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगरला रुग्णालयात जाईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. त्यानंतर आज सकाळी 11च्या सुमारास शस्त्रक्रिया करून त्यांच्या खांद्यातून मागे गेलेली पिस्तुलाची गोळी बाहेर काढण्यात आली व एकदाची पठारे यांची वेदनांतून सुटका झाली. 

गोळ्यांच्या पुंगळ्या घटनास्थळी सापडल्या.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर गोळीबार करणारा आरोपी सचिन ताके (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याच्यावर यापूर्वी श्रीरामपूर, तोफखाना (नगर) व शिर्डी पोलिस ठाण्यात 25हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार, अशीच त्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्याला काही काळ हद्दपारही केले होते. पोलिसांसोबत झटापट सुरू असताना, ताके याच्याकडील गावठी पिस्तूल पोलिस कर्मचारी रशीद शेख यांनी हिसकावून घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ताके याने झाडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या पोलिसांना घटनास्थळी सापडल्या. त्यासाठी बराच वेळ चितळी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. बराच वेळ शोध घेतल्यानंतर या पुंगळ्या शोधण्यात पोलिसांना यश मिळाले.

सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश

दुसऱ्या आरोपीचे नाव अमित सांगळे (रा. टाकळीमियॉं, ता. राहुरी) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात त्यांनी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. ती नाशिक जिल्ह्यातून चोरली असावी, असा पोलिसांना संशय आहे. 
दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल पठारे यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी सचिन ताके यास न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-one hour bullet into the body of a policeman