कोरोनासाठी हवे 21 लाख कोटींचे पॅकेज : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

"सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. भारताचे सुमारे 25 हजार विद्यार्थी जगातील 37 वेगवेगळ्या देशांत अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीही केंद्राने धोरणात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना चारशे डॉलर म्हणजे सुमारे 30 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कऱ्हाड :  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेले एक लाख 70 हजार कोटींचे प्रोत्साहनपर पॅकेज अत्यल्प आहे. ते देशाच्या अर्थसंकल्पाच्या एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी आहे. हे पॅकेज वाढवून दहा टक्‍क्‍यांपर्यंत म्हणजे 21 लाख कोटींपर्यंत वाढविले पाहिजे. ती मदत थेट लोकांच्या हातात पडली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
 
श्री. चव्हाण म्हणाले, ""प्रगत देशांनी प्रोत्साहनपर पॅकेजवर त्यांच्या अर्थसंकल्पाच्या 10 ते 22 टक्के इतका खर्च केला आहे. त्या तुलनेत भारतात पॅकेज कमी आहे. अमेरिकेने 10 टक्के, इंग्लडने 16 टक्के, तर जर्मनीने 22 टक्के प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केले आहे. मात्र भारतात जाहीर झालेले प्रोत्साहनपर पॅकेज देशाच्या अर्थसंकल्पाच्या एक टक्काही नाही. ते दहा टक्‍क्‍यापर्यंत वाढवले पाहिजे. पॅकेजचे पैसे थेट शेतकरी, रोजंदारी कामगार, मजुरांच्या हातात पडले पाहिजेत. त्यासाठी यंत्रणा राबण्याची गरज आहे.'' 
""देश व राज्यात बांधकाम मजूर कल्याण निधीच्या मोठ्या रकमा पडून आहेत. त्यात राज्यात आठ हजार कोटी, तर देशाच्या कल्याण निधीकडे जवळपास 31 हजार कोटींची रक्कम पडून आहे. त्याच्या पूर्ण उपयोग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्या प्रत्येक घटकाला किमान पाच हजार रुपये त्यांच्या बॅकेच्या खात्यावर जमा करण्याची गरज आहे. त्याशिवाय देशभरात सुरू असलेले मजुरांचे स्थलांतर थांबणार नाही. मजुरांचे स्थलांतर कोरोनाच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान मजुरांबाबत कल्याण निधीकडील रकमेचा योग्य वापर करावा. शेतकरी सन्मान योजनेची तीन महिन्यांची रक्कम एकाच वेळी त्यांच्या खात्यावर जमा करावी,'' अशीही सूचना श्री. चव्हाण यांनी केली.
 
ते म्हणाले, ""केंद्र सरकारने हवाई सीमा लॉकडाऊन केल्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे कठीण झाले आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आर्यलंड, इटली येथील अनेक पर्यटक भारतात अडकले आहेत. त्यांना परत नेण्यासाठी त्या देशांनी त्यांच्यासाठी विशेष विमानांची सोय केली आहे. त्यासाठी भारत सरकारकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. त्यांच्यासाठी विशेष विमानांचे उड्डाण होणार आहे. परदेशातील पर्यटकांना येथून सोडण्यासाठी जाणारी विमाने मोकळीच परत येणार आहेत. त्याच वेळी त्या विमानातून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन यावे.'' 
परदेशात विविध कंपन्यांत कामाला असणाऱ्यांनी त्यांचे जॉब सोडून ते बाहेर पडले आहेत. त्यांना विमानतळावर आल्यानंतर विमान उड्डाण रद्द झाल्याचे समजले आहे. जॉब सोडल्याने ते परत कंपनीत जाऊ शकत नाहीत. त्याच देशात विमानतळाशेजारीच खोल्या भाड्याने घेऊन ते राहिले आहेत. त्यांचा सन्मान राहिला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने त्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. त्यांना परत आणण्यात अडचणी असतील, तर बाहेरच्या देशात अडकलेल्या भारतीयांच्या बॅंक खात्यात शासनाने प्रत्येक चारशे डॉलर्स म्हणजेच तीस हजार रुपये जमा करावेत,'' असेही माजी मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. 

चक्क कोरोना संशयितासमवेतच डोहाळ जेवण

Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान 

भारताचे सुमारे 25 हजार विद्यार्थी जगातील 37 वेगवेगळ्या देशांत अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठीही केंद्राने धोरणात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना चारशे डॉलर म्हणजे सुमारे 30 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहोत.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण

 

  • केंद्राने व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवावी 
  • परदेशातील अडकलेल्यांना परत आणा किंवा त्यांच्या खात्यात पैसे भरा 
  • मजुरांच्या खात्यात किमान पाच हजार रुपये जमा करा 
  • शेतकरी सन्मान योजनेची तीन महिन्यांची रकम एकदम द्या 
  •  देशातील सामान्य नागरिकांना भरवसा देण्याची खरी गरज 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty One Lakh Crore Package Needed Says Congress Leader Prithviraj Chavan