esakal | या वीस ठिकाणच्या उरूस, यात्रा, उत्सवांवर "कोरोना'चे सावट 
sakal

बोलून बातमी शोधा

At twenty places festival's  under shadow of Corona virus in Sangali District

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील जत्रा, यात्रा, उरूस, उत्सव रद्द करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

या वीस ठिकाणच्या उरूस, यात्रा, उत्सवांवर "कोरोना'चे सावट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील जत्रा, यात्रा, उरूस, उत्सव रद्द करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठा मिरजेचा उरूस आणि सर्वात मोठी असलेली आरेवाडीची यात्रा होणार का, याविषयी आता शंका निर्माण झाल्या आहेत.

या दोन्ही उत्सवांच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम वगळता अन्य गर्दीचे सोहळे आणि स्टॉल लावून विक्री करण्याची व्यवस्था रद्द करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 
कोरोना विषाणूंचा धोका वाढतो आहे. शेजारील पुणे जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत. पुण्यात जिल्ह्यातील काही हजार लोक नोकरीच्या निमित्ताने स्थायिक आहेत.

पुण्याशी नियमित व्यवहार आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका खूप लांब राहिलेला नाही. तो जिल्ह्यात शिरकाव करू नये, यासाठी सर्व ते प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. विशेषतः गर्दी टाळावी, यासाठी ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जत्रा, यात्रा, उरसाचे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेने अशा कार्यक्रमांना परवानगी देणे बंद करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बहुतांश सर्व कार्यक्रम रद्द होतील, अशीच स्थिती आहे. 

मार्च महिन्यातील उर्वरित पंधरा दिवस आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील उत्सवांबाबत श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेतील नोंदींवर नजर टाकली असता जिल्ह्यात सुमारे वीस मोठ्या जत्रा, यात्रा आणि उरूस नियोजित आहेत. रविवारपासून (ता. 15) शिराळा तालुक्‍यातील शिरसी येथे काळभैरव यात्रा, तसेच धुळगाव (ता. तासगाव) आणि पद्माळे (ता. मिरज) गावचा उरूस आहे. 19 ला कुमठे आणि मणेराजुरी (ता. तासगाव) येथील उरूस आहेत. जुनी धामणीतही याच दिवशी उरूस होणार आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठा उरूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेत 20 मार्चपासून कार्यक्रम नियोजित आहेत. त्यावरही कोरोनाचे सावट आहे. 21 ला समडोळीचा उरूस आहे. 25 पासून इटकरे, नागाव (ता. वाळवा), यमगरवाडी (ता. तासगाव), वाकुर्डे खुर्द, खेड (ता. शिराळा) येथील यात्रा होणार आहेत. 29 ला कडेपूरची यात्रा आहे. 30 ला नागठाणेची यात्रा असून त्याच दिवशी शिगावची यात्रा नियोजित आहे. 31 मार्च रोजी जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून परिचित असलेली आरेवाडीची बिरदेव यात्रा नियोजित आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 तारखेला कळंबीचा उरूस, 4 तारखेला सिंगनहळ्ळी (ता. जत)ची यात्रा नियोजित आहे. 

अधिकृत घोषणा नाही 
सोबत नमून केलेल्या गावांनी अद्याप कार्यक्रम रद्द झाल्याबद्दलचे किंवा त्यात बदल केल्याबाबतचे अधिकृत जाहीर केलेले नाही. या गावांमध्ये सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. गावकऱ्यांनी हा मुद्दा भावनिक न करता व्यापक लोकहिताचा विचार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.