सायखिंडीच्या मनोहरबाबा विद्यालयात 20 वर्षांपासून साजरा योगादिन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

आश्वी : जागतिक योग दिन शासकिय सक्तीने साजरा होण्यापूर्वीच, सुमारे 20 वर्षांपासून सातत्याने व जाणीवपूर्वक योगविद्येचा प्रचार प्रसार करणारी एकमेव शाळा म्हणून संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील मनोहर बाबा विद्यालय ही शाळा ओळखली जाते.

आश्वी : जागतिक योग दिन शासकिय सक्तीने साजरा होण्यापूर्वीच, सुमारे 20 वर्षांपासून सातत्याने व जाणीवपूर्वक योगविद्येचा प्रचार प्रसार करणारी एकमेव शाळा म्हणून संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील मनोहर बाबा विद्यालय ही शाळा ओळखली जाते.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्यापीठ संघाचे नेतृत्व केलेल्या क्रीडाशिक्षक संदीप सातपुते यांच्यामुळे व त्यांना प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापक आण्णासाहेब चोथे यांच्या सहकार्यामुळे या विद्यालयाची योगविद्या शिकविणारे विद्यालय म्हणून वेगळी ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे. सातपुते यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा लाभ ते अनेक वर्षांपासून आपल्या शिष्यांना देत आहेत. शालेय कामकाजाच्या दिवसात आठवड्यातील प्रत्येक शनिवारी या विद्यालयात योगाचा सराव केला जातो. 

मनोहर बाबा विद्यालयाच्या संघाने नाशिक येथे २००१ साली झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा करंडक मिळविला होता. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी विद्यार्थी योगाची प्रात्यक्षिके सादर करतात. या विद्यालयात एलसीडी. प्रोजेक्टरवर शिक्षण देतांना पुरक हालचाली, प्रार्थना, सुर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, योगासन प्रात्यक्षिकांसह योगाचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले जातात. आजच्या जागतिक योगादिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगप्रशिक्षक बजरंग जेडगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी घुलेवाडी केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी उपस्थित होते. आभार रविंद्र वर्पे यांनी मानले.

आजच्या गतीमान युगात शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम यांना खूप महत्व असून, आपल्या देशातील ही पूरातन योगविद्या विदेशात लोकप्रिय होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने योगविद्या शिकविणाऱ्या या विद्यालयाचा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. - योगप्रशिक्षक बजरंग जेडगुले 

Web Title: Before twenty years mnoharbaba school every day doing yoga